Home शहरे अकोला शासकीय योजना; पुणे विभागात लोककला पथकांच्या माध्यमातून प्रचार-प्रसिध्दी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासकीय योजना; पुणे विभागात लोककला पथकांच्या माध्यमातून प्रचार-प्रसिध्दी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
शासकीय योजना; पुणे विभागात लोककला पथकांच्या माध्यमातून प्रचार-प्रसिध्दी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि.21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपक्रमांतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत महाविकास आघाडी शासनाकडून राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची लोककला पथकांच्या माध्यमातून प्रचार-प्रसिध्दी मोहीम नुकतीच राबविण्यात आली. त्यास विभागातील तीनही जिल्ह्यात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाच्या दोन वर्षेपुर्तीनिमित्त ही मोहिम राज्यात सर्वच जिल्ह्यात 9 ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली.

विविध लोककला…

लोककला पथकांनी शाहीरी, पथनाट्य, पोवाडे, भारुडं यांच्या माध्यमातून योजनांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवली. यात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील प्रसन्न प्रॉडक्शन, कलाछंद व जय मल्हार कलामंच या तीन कला पथकाच्या माध्यमातून तर सातारा जिल्ह्यातील त्रिरत्न सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था, आधार सामाजिक विकास संस्था व लोकरंगमंच, सातारा या कला पथकांच्या माध्यमातून तसेच सोलापूर जिल्ह्यातील जय भवानीकला पथक सांस्कृतिक मंडळ, भैरव मार्तंड जागरण गोंधळ व सांस्कृतिक कलामंच व महात्मा फुले ग्रामीण विकास संस्था या संस्थांमार्फत योजनांची   प्रचार-प्रसिध्दी करण्यात आली.

गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने राबविलेली धोरणे, घेतलेले निर्णय, कार्याची माहिती या मोहिमेद्वारे देण्यात आली. पुणे विभागातील तीनही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील सुमारे 189 गावांमध्ये शासनाच्या योजना लोककलांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत गावोगावी पोहचवल्या. विभागातील सर्वच गावांमध्ये हजारो नागरिकांकडून या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मान्यवरांकडून कौतुक

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पुणे भेटी दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी मंत्रीमहोदयांची भेट घेऊन पुणे जिल्ह्यात राबविलेल्या या उपक्रमाची माहिती दिली. तसेच या संदर्भात वृत्त व छायाचित्रे दाखवले. त्यावर समाधान व्यक्त करुन मंत्री महोदयांनी कौतुक केले. व असे उपक्रम सातत्याने राबविण्याबाबत सूचना केल्या.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही या उपक्रमाचे वृत्त व छायाचित्रे पाहून चांगला उपक्रम राबविल्याबाबत समाधान व्यक्त केले.