Home शहरे अकोला विधानसभा लक्षवेधी

विधानसभा लक्षवेधी

0
विधानसभा लक्षवेधी

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील भाडेपट्ट्याच्या ८ टक्के दरवाढीला स्थगिती

मालमत्ता वापरनिहाय वेगवेगळे दर लागू करण्याचे विचाराधीन असल्याची -नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. २५ : नागपूर महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता मूल्यांकनावर वार्षिक भाडे दर कमी करुन सरसकट भाडेपट्टा दरनिश्चिती करण्याऐवजी  वापरनिहाय वेगवेगळे दर लागू करण्याचे विचाराधीन आहे, त्यासाठी समिती नेमण्यात येणार असून वाढ केलेल्या ८ टक्के दराला स्थगिती देण्यात येत असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नगरविकासमंत्री म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेच्या ‘भूभाटक’ म्हणजे मालमत्ता कराच्या दरामध्ये सप्टेंबर २०१९ मध्ये ०.०२ टक्क्यांवरुन थेट ८ टक्के वाढ केल्याने त्याचा प्रभाव महानगरपालिकेच्या भाडेपट्टा वसूलीवर झाला आहे. नागरी भागातील सोयी-सुविधांसाठी महसूल निधी उपलब्ध व्हावा म्हणून हा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र ही भाडेपट्टावाढ रद्द करण्यासाठी अनेक ठिकाणाहून पाठपुरावा करण्यात आला आहे, ही वाढ रद्द करण्यासाठी सदर मालमत्तेच्या वापरानुसार हा दर ठरविण्याची मागणी आली. त्यामुळे निवासी, धर्मादाय व सार्वजनिक, वाणिज्यिक तसेच औद्योगिक वापरानुसार याचे दर ठरविण्यात यावे, यासाठी समिती नेमून रेडिरेकनर बाजारमूल्यानुसार लोकांना परवडेल असे दर ठरविण्यात येतील, त्यासाठी  ८ टक्के दर वाढीला स्थगिती देण्याची घोषणा नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना केली.

नागपूर महानगरपालिकेने लागू केलेल्या या दरवाढीला स्थगिती देतानाच अंतिम निर्णय होईपर्यंत जुन्या ०.०२ टक्के दराने वार्षिक भाडे आकारणी करण्यात येणार असून अंतिम निर्णय झाल्यानंतर निश्चित केलेल्या दराच्या फरकाची रक्कम भरण्याची हमी घेण्यात यावी, असेही नगरविकासमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

०००