Home बातम्या ऐतिहासिक तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

0
तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे दि.३१ – अन्न, वस्त्र आणि निवारा या तृतीयपंथीयांच्या मुलभूत समस्या आहेत. यातील महत्वाचा दूवा त्यांचा मताधिकार आहे. एका मताचे सामर्थ्य सर्वांनी जाणून घ्यायला हवे. मताधिकार असला तर संघटीतपणे आपल्या समस्या दूर करता येणे शक्य आहे. त्यामुळे तृतीयपंथींसाठी काम करणाऱ्या संस्थांनी मतदार म्हणून त्यांची  नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त आयोजित ‘सतरंगी-इंद्रधनुष्य समारंभा’त ते बोलत होते. कार्यक्रमाला  मुक्त पत्रकार संयोगिता ढमढेरे, किशोरी गद्रे, छायापत्रकार जोया लोबो, ललित साळवे आदी उपस्थित होते.

श्री.देशपांडे म्हणाले, लोकशाही खऱ्या अर्थाने प्रगल्भ होण्यासाठी ती सर्वसमावेशक असायला हवी आणि त्यात सर्वांचा सहभाग असायला हवा अशी भावना ठेवून निवडणूक आयोग काम करती आहे. देह विक्री करणाऱ्या स्त्रीया किंवा तृतीयपंथी व्यक्तींना या प्रवाहात सहभागी करून घ्यायला हवे. निवडणूक आयोगाने मतदार यादीत तृतीयपंथी व्यक्तींचे नाव नोंदणीसाठी काही विशेष सुविधा दिली आहे. त्यांना वयाच्या दाखल्यासाठी गुरुचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. २१ वर्षावरील तृतीयपंथीचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.

निवासाच्या पुराव्यासाठी तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र रहिवास म्हणून पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. तृतीयपंथी मतदारांबाबत हाच पुरावा ग्राह्य धरण्याचाही प्रस्ताव आयोगाला सादर करण्यात आला आहे. पोस्टाचे कुठलेही टपाल पत्त्यावर मिळाले असल्यास तोदेखील पुरावा ग्राह्य धरण्यात येतो. ही माहिती आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात या दिवसाच्या निमित्ताने मतदार नोंदणीचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मतदार यादीतील नाव व तपशीलही बदलण्याची सुविधा आयोगाने दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याने आनंद झाल्याचे नमूद करताना अशा कार्यक्रमातून नवी ऊर्जा मिळते, अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.  पुरस्कार विजेत्या व्यक्तींचे निवडणूक आयोगाला ‘थींकटँक’ म्हणून उपयोग होईल, असेही श्री.देशपांडे म्हणाले.

श्रीमती ढमढेरे यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. तृतीयपंथींयांना आपली ओळख प्रस्थापित करण्याची आता संधी मिळते आहे. काहींनी ही ओळख स्थापित करण्यासाठी प्रयत्न केल्याने हे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. उतरंडीचे जग नष्ट होऊन समतेचे जग स्थापित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री.देशपांडे यांच्या हस्ते संयोगिता ढमढेरे, शर्मिष्ठा भोसले, नंदिता अंबिके, मनिषा गोगटे, हरीष सदानी, गौरी शिंदे, बिंदूमाधव खिरे आणि ट्रान्स-थॉट संस्थेचा ‘सर्चलाईट’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. लावणी मार्गदर्शिका रोझा यांनादेखील यावेळी गौरविण्यात आले.

जोया लोबो यांनी आपल्या पत्रकारितेतील अनुभव यावेळी मांडले. स्वत:ला सक्षम करणे गरजेचे असल्याचे अनुभवातून शिकले. पहिली तृतीयपंथी छायापत्रकार असल्याचा आंनद असल्याचे त्यांनी सांगितले. निष्ठा डिशांत आणि विकी शिंदे यांनीदेखील आपला अनुभव व्यक्त केला.

शमिभा पाटील यांनी प्रास्ताविकात तृतीयपंथी ओळख दिनाच्या आयोजनाबाबतची माहिती सांगितली. यावर्षी युनिसेफने आपल्या लिंग समानता कार्यक्रमाचा भाग म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध लावणी, शाहीरी जलसा, नाट्यप्रवेश आदी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

000