Home शहरे अकोला अतिक्रमीत जागेचा मालकी हक्क मिळल्यामुळे गरिबांना विविध योजनेचा लाभ घेता येणार – पालकमंत्री सुनील केदार

अतिक्रमीत जागेचा मालकी हक्क मिळल्यामुळे गरिबांना विविध योजनेचा लाभ घेता येणार – पालकमंत्री सुनील केदार

0
अतिक्रमीत जागेचा मालकी हक्क मिळल्यामुळे गरिबांना विविध योजनेचा लाभ घेता येणार – पालकमंत्री सुनील केदार

वर्धा, दि.5 (जिमाका) : प्रत्येक व्यक्तीचे आपले स्वत:चे घर असावे हे स्वप्न असते. प्रत्येकाचे हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वासाठी घरे 2022 अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल व जागेचे पट्टे वाटप करुन मालकी हक्क मिळवून देण्यात येत आहे. या मालकी हक्क मिळालेल्या लाभार्थ्यांना आता ख-या अर्थाने विविध योजनेचा लाभ मिळणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुनील केदार यांनी  हिंगणघाट येथे घराच्या जागेचे पट्टे वाटप कार्यक्रमात केले.

सर्वासाठी घरे 2022 अंतर्गत उपविभागीय कार्यालय हिंगणघाट व पंचायत समितीच्यावतीने पंचायत समिती हिंगणघाट येथे वर्धा व देवळी विधानसभा क्षेत्रातील अतिक्रमीत जागेवर घरकुल असलेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला  आमदार रणजित काबंळे, आमदार समिर कुणावार, माजी आमदार अशोक शिंदे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, हिंगणघाट पंचायत समितीच्या माजी सभापती शारदा आंबटकर, माजी उपसभापती अमोल गायकवाड, तहसिलदार सतिश मासाळ आदी उपस्थित होते.

सर्वांसाठी घरे 2022 अंतर्गत घरे नसलेल्या कुटूंबांना घरकुल, घरकुलासाठी जागा, अतिक्रमीत जागेवर असलेल्या कुटूंबाना नियमानुकुल जागेचे मालकी हक्क अशा विविध योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. स्वत:च्या मालकी घर लाभार्थ्यांना उपलब्ध झाल्या त्यांना इतर विविध शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्हयाचा पाणी टंचाईच्या तीन टप्प्यात आराखडा मंजूर करण्यात आला असून आराखडयानुसार जिल्हयातील सर्व गावे पाणी टंचाईमुक्त होणार असल्याचे यावेळी श्री केदार म्हणाले.

जिल्यातील ब-याचशा अतिक्रमीत व वनविभागाच्याय जागेवर असलेल्या लाभार्थ्यांचे जागेचे पट्टे मंजूर करण्यात आले नाही. परंतु नियमानुकुल असलेल्या जागेच पट्टे मंजूर करण्यात आले असल्याचे श्री कुणावार म्हणाले.

अतिक्रमीत असलेल्या जागेचे पट्टे मिळालेल्या लाभार्थ्यांनी  तात्काळ मोजणी करुन स्वत:चे घर तयार करुन घ्यावे व शासनाच्या योजनेचा लाभ प्राप्त करुन घ्यावा. तसेच आदिवासी बांधवांना वन हक्क कायदयानुसार पट्टे प्राप्त होणार असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन रणजित काबंळे यांनी केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात जागेचे पट्टे वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाला  नायब तहसिलदार श्री पठाण, घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

                                                            000