प्रत्येक घरी नळाने पाणी योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

प्रत्येक घरी नळाने पाणी योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
- Advertisement -

मुंबई दि 12: पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी पुरविण्याचे 71 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. वर्षा निवासस्थानी जलजीवन मिशन आढावा बैठक झाली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सल्लागार सीताराम कुंटे, सचिव संजीव जयस्वाल,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशन अभियान संचालक ह्रषिकेश यशोद तसेच पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे म्हणाले, पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर असून उर्वरित कामेही वेगाने पूर्ण करण्यात यावीत. योजनांच्या देखभाल-दुरुस्तीवर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.

 

जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र अग्रेसर – गुलाबराव पाटील

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी या योजनांच्या देखभाल दुरुस्तीवर विशेषत्वाने भर देण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून मिशन अंतर्गतची कामे वेगाने पूर्ण होतील. जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती नळजोडणी, पाणी गुणवत्ता, संस्थात्मक नळजोडणी  व हर घर जल गावे घोषित करण्याच्या उद्देशाने विशेष मोहिमही राबवण्यात आली आहे.

पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत घरगुती नळ जोडणीसह पुरेशा प्रमाणात निर्धारित गुणवत्तेसह पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत राज्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह सर्वच यंत्रणाव्दारे पाणीपुरवठा योजनांची कामे वेगात सुरू असल्याचे सचिव संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

जल जीवन मिशन हा केंद्र शासनप्रणीत ५०:५० टक्के सहभागावर आधारित कार्यक्रम आहे. जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासन देशातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन २०२४ पर्यंत “हर घर नल से जल  (Piped Water supply)- प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे. राज्यातही जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे.

सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण  भागातील प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक नळ जोडणीद्वारे कमीत कमी ५५ लिटर प्रति माणसी, प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जल जीवन मिशनच्या राज्यातील अंमलबजावणीकरीता राज्यस्तरावर राज्य पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हास्तर पाणी व स्वच्छता मिशन कार्यान्वयन यंत्रणा आहे. ग्राम पातळीवर जल जीवन मिशन अंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती यंत्रणा म्हणून ग्रामीण पाणी व स्वच्छता समिती काम करते. राज्यातील १,४६,०८,५३२ ग्रामीण कुटुंबांपैकी १,०३,५२.५७८ (७१ टक्के) ग्रामीण कुटुंबाकडे वैयक्तिक नळ जोडणी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

- Advertisement -