कोल्हापूर दि. 18 :- राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारे आणि पुरोगामी विचारांचा जागर करणारे राजा. राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी कृतज्ञता पर्वात लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. शाहू महाराजांचे विचार हे अनमोल ठेवा असून त्यांचे कार्य आणि विचार भावी पिढीला आजही मार्गदर्शक व प्ररेणादायी आहे. कृतज्ञता पर्वाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार, दृष्टिकोनाचा परिचय करुन देण्याबरोबरच समतेचा संदेश देणाऱ्या शाहू विचारांचा हा ठेवा सामान्यांपर्यंत पोहचविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचा शुभारंभ ऐतिहासिक भवानी मंडप येथे आज दिमाखात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पी. एस.पाटील, यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व शाहू प्रेमी उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्तने १८ एप्रिल ते २२ मे २०२२ कालावधीत विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, शाहू महाराजांची उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांच्या दूरदृष्टीने सुरु केलेल्या शाहू मिलमध्ये कृतज्ञता पर्वाचे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. शाहू महाराजांचे कार्य सामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृतज्ञता पर्वाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांच्या रथोत्सवाचे औचित्य साधून होत आहे ही बाब आनंदाची आहे. या कृतज्ञता पर्वात सहभागी होण्यासाठी सर्वांना निमंत्रित करत असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने या कृतज्ञता पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.
कोल्हापूर जिल्ह्याला वेगळा इतिहास असून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या दूरदृष्टिने कृषि व्यापार, उद्योग घटकांच्या वाढीसाठी अनेक उपक्रम, योजना राबवून या भागाचा विकास केला आहे. त्यांच्या संकल्पनेतील विकास घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया, हीच कृतज्ञता पर्वात राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल असा विश्वास पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी २१२ कोटी रूपयांच्या रकमेस शक्ती प्रदत्त समितीची मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
राजर्षी शाहूंचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत…. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराजांच्या विचार, आचार, कार्यातून समाजाची उन्नती साधणार असल्याने प्रत्येकाने राजर्षी शाहू महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी केले. ते म्हणाले, समाज सुधारणा कार्यात राजर्षी शाहूंना तत्कालीन प्रतिगामी विचारांचा विरोध सहन करावा लागला. मात्र याची पर्वा न करता त्यांनी समाज सुधारणा कार्य सुरुच ठेवले. राजर्षी महाराजांना आपण त्यांच्या कार्यातून जाणून घेऊन त्यांनी घालून दिलेला पुरोगामी विचाराचा वारसा जतन करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचे कार्यक्रम शाहू मिल मध्ये होत आहेत ही गौरवाची बाब आहे. या मिलला मोठा इतिहास असून मिलच्या जागेत शाहूंचे चांगले स्मारक व्हावे, अशी अपेक्षा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शाहू महाराजांच्या विचारात मोठी ताकद आहे. राजवाड्यात राहणाऱ्या या लोकनेत्याने जनसामान्यांच्या कल्याणासाठी समतेचा लढा दिला. बहुजनांना न्याय देण्याचे काम त्यांनी अखंडपणे केले. अशा या राजाचे विविध पैलू असणारे व्यक्तीमत्व कृतज्ञता पर्वाच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर आणूया. शाहू राजे हे संवेदनशील मनाचे राजे होते त्यांचा हा गुण आपण आत्मसात करुया, असे आवाहन त्यांनी केले. कृतज्ञता पर्वाचा शुभारंभ 18 एप्रिल रोजी करण्यामागचा हेतूही त्यांनी यावेळी सांगितला.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, शाहू महाराजांचे कार्य हे वर्तमान भूत आणि भविष्य काळासाठी मार्गदर्शक आहे. अतुलनीय दूरदृष्टी असलेल्या या राजाने कृषि, उद्योग, व्यापार, जलसंपदा, वन यासारख्या महत्वाच्या विषयामध्ये केलेले काम आजही प्ररेणादायी असेच आहे. पददलितांना न्याय देवून समतेचा संदेश देणाऱ्या राजाचे कार्य पुढे नेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. कृतज्ञता पर्वात 60 पेक्षा अधिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले. कृतज्ञता पर्वाचे कार्यक्रम शाहू मिलमध्ये होत आहेत ही गौरवाची बाब आहे. शाहू मिलची वास्तू आपल्याला प्रेरणा देणारी असून मिलच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडल्या असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
कुलगुरु डॉ. शिर्के म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणामध्ये बहुजनांसाठी केलेले काम अतुलनीय आहे. त्यांनी त्या काळात वसतीगृहांची निर्मिती केल्यामुळे अनेक विद्यार्थी घडले आहेत. शिवाजी विद्यापीठही या कृतज्ञता पर्वात सहभागी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व शुभारंभ कार्यक्रमात कृतज्ञता पर्व कार्यक्रमाची रुपरेषा असलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
000