मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्तव्यपूर्ती यात्रा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्तव्यपूर्ती यात्रा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
- Advertisement -

अमरावती, दि. 24 : मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी संकल्पनेनुसार कर्तव्यपूर्ती यात्रा उपक्रम दि. 25 ते 29 एप्रिल दरम्यान धारणी तालुक्यात ठिकठिकाणी राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या सर्व विभागांशी संबंधित अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली.

जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने मेळघाटातील विविध गावांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  त्यानुसार धारणी तालुक्यातील  कळमखार येथे दि. 25 एप्रिल रोजी कार्यक्रम होईल. कळमखार, गोंडवाडी, चिंचघाट, रत्नापूर, खा-या टेंभ्रू, खापरखेडा, पानखाल्या, दाबिदा, शिरपूर, कुसुमकोट, धुळघाट रोड, भोकरबर्डी, टिंगरी आदी विविध गावांतील नागरिकांना त्यात सहभागी होता येईल.

सुसर्दा येथे 26 एप्रिल रोजी मेळावा होणार असून, सुसर्दा, दाबका, सावलीखेडा, बिरोटी, चेंडो, धुळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, दादरा, रेहट्या, राणापिसा, राजपूर, सादराबाडी, जामपाणी, नागझिरी आदी ग्रामपंचायतीत समाविष्ट गावांतील बांधवांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे, टिटंबा येथे 27 एप्रिल रोजी कर्तव्यपूर्ती यात्रा होणार असून, टिटंब्यासह घुटी, मोगर्दा, बोबदो, राणीतंबोली, बिबामल, झिल्पी, टेंभली, तातरा, बिजूधावडी, झापल, मांडवा, सालई गावांचे नागरिक त्यात सहभागी होतील.

बैरागड येथे 28 एप्रिलला होणा-या उपक्रमात बैरागड, कुटंगा, रंगूबेली, भोंडीलावा, धारणमहू, हरदोली, काटकुंभ, चटवाबोड आदी विविध गावांचे नागरिक सहभागी होतील. हरिसाल, जांबू, नांदुरी, चौराकुंड, दुणी, चाकर्दा, कारादा, मांगिया, काकरमल, राणामालूर, दिया, बेरडाबल्डा आदी ग्रामपंचायतींसाठी हरिसाल येथे 29 एप्रिल रोजी मेळावा होणार आहे.

या मेळाव्यात सर्व विभागांची कार्यालये सहभागी होतील. मेळघाटातील दुर्गम भागातील, तसेच गोरगरीब नागरिकांच्या अडचणींचे कर्तव्यपूर्ती यात्रेच्या माध्यमातून निराकरण करण्यात येईल. मेळघाटातील बांधवांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री श्री. कडू व आमदार श्री. पटेल यांनी केले आहे.

000

- Advertisement -