Home शहरे अकोला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे आवाहन

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे आवाहन

0
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे आवाहन

नंदुरबार, दि.22 (जिमाका वृत्तसेवा) : ‍केंद्र व राज्य पुरस्कृत आरोग्य विषयक योजनांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  नंदुरबार येथे आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार डॉ.विजयकुमार गावीत, पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, उपसभापती कमलेश महाले, जि.प. सदस्य देवमन पवार, प्रकल्पस्तरीय समिती अध्यक्ष दिलीप नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, डॉ.राजेश वसावे आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड.पाडवी म्हणाले, केंद्र व राज्य शासनामार्फत नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य अशा विविध योजना राबविण्यात येत आहे.  परंतू अद्यापही या योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. ह्या योजना अधिकाधिक तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती मोहिम राबवावी. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन तत्पर असून जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी यावर्षी आदिवासी विभागामार्फत 70 कोटी तर सर्वसाधारण योजनांमधून 40 कोटी अशी एकूण 110 कोटी रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. चांगली आरोग्य सेवा देणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असून अद्यापही दुर्गम भागात डॉक्टर सेवा देण्यास तयार नसतात यासाठी त्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यात येईल. जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रिक्तपदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सिकलसेल आजाराचा समावेश करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार डॉ.गावीत म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  केंद्र शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात 5 शिबिरांचे  आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नयेत त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता शासनामार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची विविध आजाराची तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर तेथेच औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणाऱ्या रूग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असल्यामुळे या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. केंद्र शासनामार्फत नागरिकांना हेल्थ कार्ड देण्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड योजना सुरु केली असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. या आरोग्य शिबीरात मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मंजूरी प्रमाणपत्राचे वाटप

संजय गांधी निराधार योजनातंर्गत पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते  संजय गांधी निराधार योजनेचे 451, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे 448, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेचे 173, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे 323, इंदिरा गांधी विकलांग योजनेचे 3 असे एकूण 1 हजार 398 पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूरीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमास जि.प.चे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मलाताई राऊत, संजय गांधी निराधार अनुदान समिती अध्यक्ष तथा जि.प सदस्य देवमन पवार, पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले, प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष दिलीप नाईक, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नगरसेवक दिपक दिघे, अतुल पटेल, चेतन वळवी, परवेज खान, संजय गांधी निराधार समिती सदस्य रंजनाताई नाईक, दिपक गवते, इकबाल खाटीक, विश्वनाथ वळवी, भास्कर पाटील, स्वरुप बोरसे, तसेच इतर समिती सदस्य व  मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, दिलीप नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

0000