Home बातम्या ऐतिहासिक ड्रोनद्वारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप करून तयार केलेली सनद जनतेला व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभदायी – पालकमंत्री जयंत पाटील – महासंवाद

ड्रोनद्वारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप करून तयार केलेली सनद जनतेला व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभदायी – पालकमंत्री जयंत पाटील – महासंवाद

0
ड्रोनद्वारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप करून तयार केलेली सनद जनतेला व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभदायी – पालकमंत्री जयंत पाटील – महासंवाद

सांगली दि. 25 (जि.मा.का.) : गावठाण जमाबंदी प्रकल्पाची (स्वामित्व योजनेची) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल भूमि अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया अशा तीन विभागांच्या संयुक्त सहभागाने स्वामित्व योजना वाळवा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप करून जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्या हक्काच्या जागेचे आधुनिक तंत्राव्दारे अचूकपणे मोजमाप करून ‍सनद (डिजीटल नकाशे) व प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आली आहेत. याचा जनतेला व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभ होईल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

वाळवा तालुक्यातील भडकंबे येथे गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत गावठाण भूमापन झालेल्या गावचे सनद वाटप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार प्रदीप उबाळे, उपअधिक्षक भूमिअभिलेख अशोक चव्हाण, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सरपंच सुधीर पाटील, उपसरपंच, सरीता पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सनद ही शासनाने नागरीकांना दिलेला हक्काचा पुरावा आहे. हा मालकी हक्काचा पुरावा असल्याने कोणत्याही शासकीय कामकाजासाठी तो  ग्राह्य धरला जातो. त्यामुळे नागरिकांना कर्ज उपलब्धता होईल, शासनाच्या विविध आवास योजनेच्या मंजूरी कामी फायदा मिळेल, खरेदी -विक्री व्यवहारात पारदर्शकता येवून नागरीकांची फसवणूक होणार नाही. यामुळे कायमस्वरूपी वंशपरंपरागत मालकी हक्काचा पुरावा नागरिकांना मिळाला आहे. सनद ही कायदेशीर असल्याने न्यायालयीन कामकाजामध्येही पुरावा म्हणून वापरता येईल. सनदेमुळे धारकांची पर्यायाने गावाची पत सुधारेल. गावातील वाद, तंटे कमी होतील. त्याचबरोबर सार्वजनिक जागेचे संरक्षणही होईल. त्यामुळे नागरिकांनी सनदेची शासकीय फी भरून ती प्राप्त करून घ्यावी. ही सनद पुढील पिढीसाठीही उपयोगी पडेल. वाळवा तालुक्यातील सर्व गावांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून याकामी महसूल विभागाने अत्यंत चांगले काम केले असल्याचे ते म्हणाले. जातपडताळणीचे दाखले विहीत वेळेत मिळण्यासाठी येत्या काळात 10 वी, 11 वी व 12 वी मध्ये असतानाच विद्यार्थ्यांचे शाळेतच अर्ज भरून घेवून ते अपलोड करण्याची  मोहिम राबविली जाईल. त्यामुळे 12 वी पास होण्याअगोदरच विद्यार्थ्यांना त्यांच्या हातात ‍मिळतील असा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आदर्श शाळा उपक्रमांतर्गत भडकंबे येथे प्राथमिक शाळेचे चांगले डिझाइन तयार केले असून त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, वाळवा तालुक्यात पहिल्यांदाच ड्रोनव्दारे मोजमाप करून डिजीटल नकाशे व प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत. अगदी कमी वेळेत जास्त गावांचे काम झालेले आहे. स्वामित्व योजनेंतर्गत वाळवा तालुक्यात 45 गावांमध्ये नगर भूमापन झाले असून 9 हजार 144 मालमत्तांच्या सनदा तयार केल्या आहेत व 11 हजार 353 प्रॉपर्टी कार्ड तयार केली आहेत. सनद ही मालकी हक्काचा पुरावा असल्याने त्याची फी भरून प्रत्येकाने आपआपली सनद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी गावठाण जमाबंदी प्रकल्पाची सविस्तर माहितीदिली. यावेळी त्यांनी वाळवा तालुक्यातील 99 गावांपैकी 50 गावांचे यापूर्वी नगर भूमापन झाले असल्यासचे सांगून स्वामित्व योजनेंतर्गत 45 गावांचे नगर भूमापन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यामध्ये एकूण ७३६ गावे असून यापैकी २६३ गावांमध्ये यापूर्वीच नगर भूमापन योजना झालेली आहे. सध्या ४५५ गावांमध्ये ड्रोन सर्व्हेच्या सहाय्याने नगर भूमापन कामकाज करण्याची कार्यवाही चालू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात नागरिकांना सनद व प्रॉपर्टी कार्डचे  वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास भडकंबे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000