नाशिक दिनांक 26 एप्रिल 2022 (जिमाका वृत्तसेवा) : अंजनेरी ट्रेकिंग इन्स्टिट्यूट,गंगापूर येथील साहसी क्रीडा संकुल, गोवर्धन चे कलाग्राम, पिंप्री सैय्यद चे कृषी टर्मिनल, नाशिक विमानतळावरील पर्यटन सुविधा केंद्र, भावली डॅम परिसरात आदिवासी क्रिडा प्रबोधिनी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रात प्राथमिक सुविधा विकसित करणे, मुंढेगाव चित्रपट सृष्टी फेरप्रस्ताव, लासलगाव सोळागाव पाणी पुरवठा योजना व मांगीतुंगी येथे होणाऱ्या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी शासकीय सेवा सुविधांसह जिल्ह्यातील पर्यटन, क्रीडा, शिक्षण व मुलभूत सेवा-सुविधांच्या विकास कामांना गती देण्याच्या सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध कामांच्या आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, मालेगाव महावितरण मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, दिंडोरी प्रांताधिकारी संदिप आहेर, इगतपुरी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, जिल्हा उपनिबंधक डॉ सतीश खरे,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे,चित्रपट महामंडळाचे श्याम लोंढे,सुनील ढगे, मनिष रावत,आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, जयदत्त होळकर, महेंद्र काले यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुंढेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीच्या निर्मीतीसाठी इगतपुरी हे अतिशय उत्तम व सुयोग्य असे ठिकाण आहे. तसेच ते मुंबई-पुणे या शहरांना लागून असल्याने मुंबईच्या चित्रपट सृष्टीला जोडणे सोयीचे होणार आहे. त्याचप्रमाणे येथील स्थानिकांना रोजगार मिळून लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या मदतीने चित्रपट सृष्टीचा प्रकल्प अहवाल तयार करून शासनास सादर करण्यात यावा. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुंढेगावात भेट देवून तेथील ग्रामस्थांशी चर्चा करावी, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी भागातील मुले ही काटक शरीरयष्टीची असतात, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आदिवासी विभागाच्या बांधकाम विभागामार्फत या क्रीडा प्रबोधिनीसाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा, आणि यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
ट्रेकींग इन्स्टिट्यूटच्या कामाला गती द्यावी
जिल्हा क्रीडा विभागाने अंजनेरी येथील ट्रेकींग इन्स्टिट्यूट (साहसी क्रीडा केंद्र) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करावे. तसेच जिल्हा क्रीडा विभाग, पर्यटन विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी समन्वयाने प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत. यापूर्वी करण्यात आलेला करार रद्द करण्यात यावा. या साहसी क्रीडा केंद्राच्या विकासासाठी प्रशिक्षित व्यक्ती व संस्थांचे सहाकार्य घेवून केंद्रासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्यात यावी. महाराष्ट्रीतील हे पहिले ट्रेकींग इन्स्टिट्यूट तयार होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तेथील स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित यंत्रणांमार्फत प्रस्ताव सादर करावा. तसेच यापूर्वीच्या शिल्लक निधी आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या आहेत.
देशविदेशात कृषी उत्पादन निर्यातीसाठी कृषी टर्मिनल मार्केट महत्वाचे
पिंपरी सैय्यद येथे तयार होणारे कृषी टर्मिनल मार्केट शेतकऱ्यांचे उत्पादन देशाविदेशात निर्यात करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. यासोबतच येथे शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण, भाजीपाला, फळे यांच्या साठवणूकीसाठी कोल्ड स्टोरेज, मार्केटींग अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पिंपरी सैय्यद येथील गट क्र. 1621 ही जागा शैक्षणिक वापर विभागातून वाणिज्य वापर विभागात अंतर्भुत करण्यासाठीची प्रक्रीया वेळेत पूर्ण करण्यात यावी. तसेच गट क्र. 1654 मधील जागेची कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य घ्यावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिले आहेत.
विमानतळामधील पर्यटन सुविधा कक्ष अद्ययावत करावा
सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेले देशातील एकमेव असे ओझर विमानतळ आहे. या विमानतळामध्ये पर्यटकांसाठी एक सुविधा कक्ष असून या कक्षात जिल्ह्याची माहिती देणारे छायाचित्रे लावण्यात यावीत. जेणे करून आपल्या जिल्ह्याविषयी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच मुख्य दरवाजा ते विमानतळापर्यंत जाण्यासाठी महापालिकेच्या बससेवेला परवानगी देण्यात यावी. विमानतळाच्या दिशेने रस्त्यावर मार्गदर्शक फलक लावण्यात यावेत, त्याचप्रमाणे प्रवाशांसाठी विमानतळावर आवश्यक सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पस भूमिपूजनाचे नियोजन करावे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र परिसरातील रस्ते, पाणी पुरवठा व वीज या मुलभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यात येवून या केंद्राच्या कामाचे भूमिपूजन करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालनकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.
कलाग्रामच्या विकासासाठी फेर प्रस्ताव सादर करावा
जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीच्या वस्तु, महिला बचत गटांनी तयार केलेले पदार्थ, वस्तु अशा विविध घटकांतील लहान उद्योगांना हक्काची बाजारपेठ कलाग्रामच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापूर्वी प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
लासलगावं–विंचूर 16 गावे पाणीपुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करावीत
उन्ह्याळ्यात लासलगावं- विंचूर येथील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या व्या वित्त आयोगातून 16 गावे पाणी पुरवठा योजनेची दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच दुरूस्तीसाठी लागणाऱ्या वेळेत आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा.
मांगीतुंगी येथील महोत्सवास मूलभूत सुविधांसह आरोग्य, सुरक्षा व्यवस्था देणार
मांगी तुंगी येथे 15 जून पासून भगवान ऋषभदेव यांचा महामस्तकाभिषेक महोत्सवास प्रारंभ होणार आहे. हे ‘ब’ दर्जाचे तिर्थस्थळ असल्याने यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून आरोग्य व सुरक्षा व्यवस्था देखील देण्यात येतील अशी माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.