सातारा दि. 26 : कोयनानगर परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे आहेत. यातील काही पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. तरी पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकरात लवकर तयार करुन मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
कोयनानगर येथे वन्यजीव विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या मंजूर विकास कामांचा आढावा श्री. देसाई यांनी घेतला. यावेळी श्री. देसाई बोलत होते. या वैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रांतधिकारी सुनिल गाडे, वन्य जीव विभागाचे उपसंचालक उत्तम सावंत, तहसिलदार रमेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, कोयनाधरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता आशिष जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोयनाधरण परिसरात पर्यटक वाढावेत यासाठी चांगली कामे करा. नेहरु उद्यानासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून उद्यानातील नवीन कामे हाती घ्यावेत. विशेषत: या उद्यानात विविध फुलांची झाडे लावण्यावर भर द्यावा.
कोयनानगर परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन परिचय केंद्र उभे करावयाचे आहे. या परिचय केंद्राचा चांगला आराखडा तयार करा. यासाठी तज्ज्ञ आर्किटेक्चरची नेमणूक करावी.
प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण, कोयनानगर येथील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण, कोयनानगर धरण व्यवस्थापनाचे जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण ही कामे तातडीने हाती घ्यावीत, अशा सूचनाही श्री. देसाई यांनी केल्या.