Home बातम्या ऐतिहासिक मेळघाटसह सर्वदूर पावसाळ्यापूर्वी कृषी निविष्ठांची उपलब्धता ठेवा; खते, बी-बियाणे यांचा काळा बाजार खपवून घेणार नाही – कृषी मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

मेळघाटसह सर्वदूर पावसाळ्यापूर्वी कृषी निविष्ठांची उपलब्धता ठेवा; खते, बी-बियाणे यांचा काळा बाजार खपवून घेणार नाही – कृषी मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

0
मेळघाटसह सर्वदूर पावसाळ्यापूर्वी कृषी निविष्ठांची उपलब्धता ठेवा; खते, बी-बियाणे यांचा काळा बाजार खपवून घेणार नाही – कृषी मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

विभागस्तरीय खरीप हंगाम – 2022-23 नियोजन सभा

शेतकरी कुटुंबियांच्या पोषणासाठी पौष्टिकता बियाणांचा संच उपलब्ध करुन देणार

प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार

अमरावती दि. 29 : शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे त्याप्रमाणे शेतीला लागणारे पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी काटेकोर नियोजन करावे.  मेळघाट तसेच दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी खते, बी-  बियाणे पोहचण्याची व्यवस्था व्हावी. खते, बी- बियाणे यांचा काळा बाजार किंवा कुठलाही गैरव्यवहार खपवून घेणार नाही. तसे आढळून आल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिला.

अमरावती विभागाची खरीप हंगाम 2022-23 ची आढावा बैठक कृषी मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, विभागीय आयुक्त पियुष सिंह, अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा, यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे, बुलडाणा जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खरीप पिकांचे नियोजन करताना प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या विशेष धान्य पीकांचा पेरा वाढवावा. कारण कोरोना काळामध्ये पारंपारिक धान्यपिके, रानभाज्या यांच्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे, असे सांगत कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले की, खरीपासाठी शेतकऱ्यांची खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे. तसेच याबाबत दररोज जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधितांनी याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कळवावा. प्रत्येक जिल्ह्यात खतांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ब्लॉकमधील माहितीही यामध्ये देण्यात यावी. शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया राबवावी. जैविक खतांचा वापर, ठिबक सिंचन योजना तसेच शेतीमध्ये झिंक व मॅग्नेशियमचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच कोणत्या पीकाला किती खते, युरिया हवे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पोषण आहारासाठी विविध प्रकारच्या बियाणांचे संच उपलब्ध करुन दिल्या जातील. जेणे करुन सर्वांसाठी धान्य पिकविणाऱ्या  शेतकरी कुटुंबाला पुरेसा चौरस पोषण आहार मिळेल. घरातील शेतकरी महिलेचे नाव सात बारा उताऱ्यावर नोंदविल्यास महिला शेतकरी व शेतमजूरांच्या सन्मान योजनेचा लाभ सबंधितांना घेता येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

खते, बी-बियाणे यांचा काळा बाजार साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही. तसे आढळून आल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कृषी विभागामार्फत दिनांक 5 ते 23 मे या काळात       किटकनाशकांच्या दुकानांची यासंदर्भात तपासणी करावी. दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले.

पीक कर्ज वितरणाची प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी. एकही गरजू शेतकरी बांधव वंचित राहता कामा नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांमार्फत अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष उपक्रम राबवावे. पारंपारिक पिकांसह तुती लागवड, ओवा, करडई, मोहरी, हळद, पानपिंपरी तसेच सिताफळे असे प्रादेशिक विशेष वाण तसेच फळांचे उत्पादन देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेनुसार आवश्यक कार्यवाहीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. तसेच मेळघाट आणि तत्सम दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी खते, बि-बियाणे पोहोचेल याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

अमरावती विभागात 32.39 लाख हेक्टर क्षेत्र खरीपाखाली आहे. कपाशीचे 9.94 लाख हेक्टर, सोयाबिनचे 15.03 लाख हेक्टर तर तुरीचे 4.34 लाख हेक्टर एवढे सरासरी क्षेत्र आहे. खतांसाठी मंजूर आवंटन 6.57 लाख मे.टन एवढे आहे. प्रस्तावित लागवडी क्षेत्रानुसार सोयाबिनचे 10.94 लाख क्विंटल बियाणे आवश्यक आहे. ग्रामबिजोत्पादनाव्दारे शेतकऱ्यांनी 16.49 लाख क्विंटल सोयाबिन शेतकऱ्यांकडे जतन करुन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सोयाबिन बियाणे पुरवठा कमी झाला तरी टंचाई उद्भवणार नाही. तसेच सेंद्रीय खते व जैविक खतांचा वापर करुन फवारणीव्दारे व ठिबकव्दारे विद्राव्य खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक कंपनीचे रेकनिहाय, तालुकानिहाय सनियंत्रण करण्यात येवून गटांमार्फत वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सन 2022-23 मध्ये मग्रारोहयो तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत 10 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी यावेळी दिली.

शेतीविषयक उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रगतीशिल शेतकऱ्यांचा श्री. भुसे यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पौर्णिमा सवाई, बुलडाणा जिल्ह्यातील भानुदास वनारे व दादाराव हाटकर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. खतांचा कार्यक्षम वापर व त्यांचे योग्य नियोजन यासंदर्भात कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले.

अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, वाशीमचे शंकर तोटावार, बुलडाण्याचे नरेंद्र नाईक, अकोल्याचे कान्ताप्पा खोत, यवतमाळचे नवनाथ कोळपकर तसेच कृषी संलग्न विभागाचे अधिकारी, प्रगतीशिल शेतकरी आदी यावेळी उपस्थित होते.

00000