नागपूर,दि.29: कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ हा 50 टक्केमहिला शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबाबत महसूल विभाग व कृषी विभागाच्या यंत्रणांनी प्राधान्याने अंमलबजावणी करावी,असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.
वनामती येथील वसंतराव नाईक सभागृहात नागपूर विभागाच्या खरीप हंगामपूर्व आढावा सभा पार पडली. या सभेस प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, तसेच जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला (नागपूर), संदिप कदम (भंडारा), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, कृषी संचालक दिलीप झेंडे, विकास पाटील, दशरथ तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे उपस्थित होते.
उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करतांना कृषीमंत्री भुसे म्हणाले की, गेल्या हंगामात घरचे सोयाबीन बियाणे वापराबाबत राबविण्यात आलेल्या मोहिमेस यश मिळाले. ई-पीक पाहणी हा शासनाचा क्रांतिकारी निर्णय असून याबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिकाधिक जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते यांचे नियोजन करण्यात आले आहे. बियाणे, खते, किटकनाशके यांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर केवळ विक्रेत्यांवरच नव्हे तर उत्पादक कंपन्यांवरही फौजदारी करण्यात यावी,असे निर्देश त्यांनी दिले.
पिकांची उत्पादकता वाढविणे व त्यांची मुल्य साखळी बळकट करणेयासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यादृष्टीने नागपूर विभागात कापूस, सोयाबीन सारख्या पिकांना तसेच वर्धा जिल्ह्यात हळदीसारख्या पिकाबाबत लाभ घ्यावा. शासनाने हळद लागवडीला चालना देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
शेतीच्या कामांमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे, त्यासाठी महिला शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये 50 टक्के लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे. या आधी हा सहभाग 30 टक्के होता तो आता 50 टक्के करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाच्या लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांचे नाव साताबारा उताऱ्यावर लावता येणार आहे. त्यासोबतच या वर्षापासून शासनातर्फे प्रत्येक शेतकरी कुटुंबांना आहारमूल्य असणारी फळे, भाजीपाला पिकांच्या बियाण्याचे किट मोफत दिले जाईल. त्याची लागवड शेताच्या बांधावर वा परसबागेत करुन शेतकरी कुटुंबातील सदस्यांना घरच्या घरी पौष्टिक आहार उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2022 चे नियोजन
नागपूर विभागात येत्या खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्यानुसार, कापसाची लागवड 6 लाख 38 हजार 316 हेक्टर, सोयाबीन लागवड 3 लाख 9 हजार 781 हेक्टर, भात8 लाख 60 हजार 527 हेक्टर, तुर 2 लाख 19 हजार 610 हेक्टर, ज्वारी 11 हजार 205 हेक्टर, भुईमुग 2 हजार 675 हेक्टर या प्रमाणे पेरणीचे नियोजन करण्यात आली आहे. विभागासाठी 7 लक्ष 70 हजार 066 मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून मंजुर आवंटन 6 लाख 24 हजार 820 मेट्रिक टन इतके आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
******