Home बातम्या ऐतिहासिक व्यसनमुक्त व्हा, आरोग्याची काळजी घ्या – पालकमंत्री विजय वडेट्टीवार – महासंवाद

व्यसनमुक्त व्हा, आरोग्याची काळजी घ्या – पालकमंत्री विजय वडेट्टीवार – महासंवाद

0
व्यसनमुक्त व्हा, आरोग्याची काळजी घ्या – पालकमंत्री विजय वडेट्टीवार – महासंवाद

सावली येथे आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

चंद्रपूर दि. 30 एप्रिल : आरोग्य हीच आपली खरी धनसंपदा आहे. कोरोनाच्या महामारीत अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. ही परिस्थती पुन्हा येऊ नये म्हणून राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला आहे. आपल्या भागात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. कॅन्सरची सुरुवात व्यसनाने होते. हे व्यसनच आपल्याला मृत्युच्या दारात घेऊन जाते. त्यामुळे नागरिकांनो व्यसनमुक्त व्हा आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे कळकळीचे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

सावली येथे तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी सावली नगर पंचायतीच्या अध्यक्षा लता लाकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, दिनेश चिटकुनवार, नंदू नगरकर, डॉ. प्रकाश साठे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास वाघधरे आदी उपस्थित होते.

खर्रा, तंबाखु, बिडी, सिगारेट, मद्य आदी व्यसनापासून तरुणांनी दूर राहावे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आपले आरोग्य सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे. सद्यस्थितीत उन्हाचा पारा 46 अंशाच्या पार गेला आहे. पुढील महिन्यात हा पारा कितीपर्यंत जातो, माहित नाही. त्यामुळे उन्हापासून स्वत:चे संरक्षण करा. आज येथे उपचार करण्यासाठी सावंगी (मेघे) येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात येथे उपचार होणार आहे. सावली येथे 50 बेडचे हॉस्पीटल मंजूर झाले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून पुढील 2 महिन्यात त्याचे काम सुरू होईल. तसेच डायलिसीस मशीनसुध्दा येथे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी 85 नवीन रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या असून जिल्ह्यात सध्या 150 च्या आसपास शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका उपलब्ध असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. अत्याधुनिक उपकरणे व रुग्णांना उपचारासाठी सोयीसुविधा देण्याचे काम सुरू आहे. सावली तालुक्यातील 70 गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 45 कोटी रुपये मंजूर झाले असून शुध्द पिण्याचे पाणी सर्व गावांत मिळणार आहे. एकही गाव यापासून वंचित राहणार नाही. कारण आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर पिण्याचे पाणी स्वच्छ असायला हवे, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगाना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात मोहन थोरात, सक्षम राऊत, भरत गोहणे, रोहन आवडे, पियुष मेश्राम, उत्तम धुर्वे आदींचा समावेश होता. तर अजय राऊत, रजत गेडाम, सविता रामटेके, गीता गोहने यांना गोल्डन ई – कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी ऑपरेटेड सायकल देण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी आरोग्य संदर्भात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली.

नगर पंचायत येथे अग्निशमन वाहनाचे लोकार्पण : सावली नगर पंचायत येथे उपलब्ध झालेल्या अग्निशमन वाहनाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर वाहन 85 लक्ष रुपये खर्च करून सावली शहरासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

०००००००