Home बातम्या ऐतिहासिक शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करावे – पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड – महासंवाद

शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करावे – पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड – महासंवाद

0
शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करावे – पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड – महासंवाद

हिंगोली, (जिमाका) दि. 01 :  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवनवीन उपलब्ध तंत्रज्ञानाची माहिती द्यावी. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि जिल्ह्याचा पॅटर्न तयार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम नियोजन, पाणी टंचाई आणि रोहयो आदी विषयाची आढावा बैठक पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी प्रा.गायकवाड बोलत होत्या. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड, अप्पर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, क्रांती डोंबे, डॉ.सचिन खल्लाळ यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणासाठी बँकानी योग्य नियोजन करुन पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावेत. ज्या बॅंका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरीत करण्याबाबत टाळाटाळ किंवा दिरंगाई करत आहेत अशा बॅंकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून त्यांना तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश देवून दररोज याबाबत पाठपुरावा करावा. बचत गटाच्या महिलांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावेत. त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी विविध योजनेची माहिती द्यावी. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन फळ बाग लागवड करावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठीची कामे येत्या दोन महिन्यात पूर्ण करावीत. तसेच पाणीपुरवठा योजनेचे वीज देयक भरण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जलसंधारणाची कामे प्राधान्याने करावीत. यासाठी प्रबोधन करावे. मातोश्री पाणंद रस्त्याची मंजूर कामे 15 जून पर्यंत पूर्ण करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

शिक्षण विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, आदर्श शाळांसाठी आणि निजामकालीन शाळेसाठी निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. याची कामे प्राधान्याने पूर्ण करावेत, अशा सूचना दिल्या. तसेच यावेळी कृषी, रोहयो, पाणी टंचाई, पाणीपुरवठा, शिक्षण आणि पोलीस विभागाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी खरीप हंगाम नियोजनासाठी व राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी 6 गावांमध्ये 8 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असून 160 विहिरी  व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्याचे सांगितले. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत सन 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन केले असल्याचे सांगितले. उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांनी मातोश्री पाणंद रस्त्याच्या कामाची माहिती दिली.  तसेच वैयक्तीक कामासाठी कुशल निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आदर्श शाळा, निजामकालीन शाळांच्या कामाची तसेच शाळापूर्व तयारी अभियानाची माहिती दिली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जननी कार्यक्रमाची, जिल्ह्यात सीसी टीव्ही बसविण्यात आल्याची माहिती दिली. तसेच खराब झालेल्या पोलीस स्टेशन इमारतीचे नुतनीकरण, नवीन पोलीस स्टेशनसाठी इमारती आणि पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थान बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

यावेळी बैठकीस विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

****