नागपूर, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरातील सीताबर्डी मेट्रो स्टेशनमध्ये आयोजित केलेल्या ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या विविध लोककल्याणकारी उपक्रम-योजनांची माहिती नागरिक जाणून घेत आहेत. प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर शासनाने कोविड काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सीताबर्डी मेट्रो जंक्शनच्या पहिल्या मजल्यावरील लाऊंजमध्ये आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी करण्यात आले. या प्रदर्शनाला नागपूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिला, युवकांसह विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देवून शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांची, योजनांच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेत आहेत. याविषयीच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा ओघही त्यांच्याकडून सुरू आहे.
गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन पाहून आनंद झाला. विशेष म्हणजे कोरोना संकटकाळात राज्य शासनाने केलेल्या यशस्वी प्रयत्नांना चांगले यश मिळाले. महिला व बालकल्याण विभागाद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे निराधारांना आधार, महिलांचा सन्मान, सुदृढ मुले, सशक्त बालक अशी पिढी घडली आहे. त्याबद्दल मी सरकारचे आभार व मनपूर्वक अभिनंदन करते, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्यातील इंदुबाई वानखडे यांनी दिली. नागपूर शहरातील आपल्या नातेवाईकांसोबत त्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
राज्य शासनाची कोरोनामुक्त ग्राम विकास योजना फार आवडली. कोरोनामुक्त ठरलेल्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून बक्षिस देण्याची ही अनोखी योजना कौतुकास्पद आणि कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी ठरल्याची प्रतिक्रिया रामभाऊ शिंदे यांनी व्यक्त केली. मेघा शिंदे म्हणाल्या की, महाविकास आघाडी शासनाने गोरगरिबांसाठी सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना आवडली. या योजनेव्दारे गोरगरीब जनतेला अगदी कमी पैशात पोटभर अन्न मिळाले.
महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी व भावी पिढीच्या हितासाठी विद्यमान महाविकास आघाडी सरकार झटत आहे. आदिवासी बांधव ते शेतकऱ्यांसाठी विविध योजना, उद्योगांच्या भरभराटीविषयीची माहिती प्रदर्शनच्या माध्यमातून मिळाली. हा उपक्रम माहितीपूर्ण आणि कौतुकास्पद असल्याचे रीहान वट्टी याने सांगितले.
राज्य शासनाने उद्योग क्षेत्रासह शेतकरी बांधव व सर्वसाधारण जनतेला चांगल्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. शासनाच्या विविध योजनांची चित्रमय माहिती एकाच छताखाली मिळाली आहे. अतिशय सुंदर सजावट आणि माहितीपूर्ण प्रदर्शन बघायला मिळाले, अशा शब्दात सौ. रेवती बेलफंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
000