- दोन वर्षपूर्ती प्रदर्शन ठरले प्रभावी माध्यम
- युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
- प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, दि.5 : दोन वर्षे जनसेवेची या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना एकत्र उपलब्ध झाल्यामुळे जनतेला योजनांचा लाभ घेणे सुलभ होत आहे. शासन – प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असून जनतेला आवश्यक असलेल्या योजनांचा लाभ विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचवावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे – चवरे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सीताबर्डी येथे मेट्रो स्टेशन वर ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ चित्रमय प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून विभागीय आयुक्तांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. महाराष्ट्र दिनापासून विकास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून आज या प्रदर्शनाचा समारोप होत आहे.
शासनाच्या विविध योजनांची माहिती अत्यंत प्रभावी व परिणामकारकपणे विविध योजनांवर आधारित संपूर्ण माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात तरुण पिढी भेट देत आहे. तरुणांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळत असल्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत वैयक्तिक व सामूहिक लाभांच्या योजनांचा लाभ देणे सुलभ होणार असल्याचे सांगतांना माधवी खोडे-चवरे म्हणाल्या की, या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविडच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करताना आरोग्य सुविधा तसेच कोरोना काळात केलेल्या कामांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोविड नंतर शासनाने विविध वर्गांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला आहे. नागपूर विभागातील जिल्हानिहाय विकास कामांची एकत्र माहिती उपलब्ध करुन दिल्यामुळे राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये विभागाचे प्रतिनिधित्व ठळकपणे पाहायला मिळाते. माहिती विभागाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा लाभ सर्वसामान्य जनतेला निश्चितच होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गडकिल्ल्यांची प्रतिकृती असलेल्या या दालनात अत्यंत आकर्षकपणे शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून नागपूर मेट्रोने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनाही हे प्रदर्शनाला अत्यंत सुलभपणे भेट देता येते. त्यामुळे हजारो नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ होत आहे.
जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके यांनी पुष्पगुच्छ देऊन विभागीय आयुक्त श्रीमती खोडे-चवरे यांचे स्वागत केले.
राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची भेट
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विकास विषयक प्रदर्शनाला राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी भेट देऊन प्रदर्शनाच्या आकर्षक मांडणी तसेच विविध योजनांची सविस्तर माहिती जनतेला उपलब्ध करुन दिल्याबद्दल माहिती विभागाचे विशेष कौतुक केले.
कोरोना कालावधीत जनजीवन ठप्प झाले होते या काळात केलेल्या कामांची माहिती देताना लाेकशाही आघाडी शासनाने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहाेचविली आहे. या प्रदर्शनाला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये नागपूर विभागातील जिल्हानिहाय पॅनलच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे माहिती उपलब्ध करुन दिली आहे. हे प्रदर्शन सर्वांनीच पाहावे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकत्र उपलब्ध झाली आहे. नागपूर मेट्रो सिताबर्डी स्टेशन हे मध्यवर्ती असल्यामुळे जनतेला प्रदर्शन पाहणे सुलभ झाले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन शासकीय योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन राहुल पांडे यांनी केले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मुनघाटे यांनीही दिली भेट
ज्येष्ठ साहित्यिक तथा नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रमोद मुनघाटे यांनी सीताबर्डीमेट्रोस्टेशन येथील राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणा-या चित्रप्रदर्शनाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी शासनाच्या दोन वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा आणि लोककल्याणकारी योजनांचा आढावा एकाच छताखाली सहज, सुलभ उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे श्री. मुनघाटे यांनी आज सांगितले.
साहित्यिक व जेष्ठ कवी ज्ञानेश वाकुडकर यांची प्रदर्शनाला भेट
ज्येष्ठ कवी व साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांनी माहिती विभागातर्फे आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. शासन राबवित असलेल्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्या हा या प्रदर्शनाचा उद्देश असून गडकिल्ल्यांच्या आकारात साकारलेले हे प्रदर्शन सर्व जनतेने पहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांना पांधन रस्ता हा महत्त्वाचा विषय आहे. पांधन रस्त्याच्या बांधकामाला विशेष प्राधान्य दिले तर शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादित मालाला बाजारपेठेपर्यंत पोचविणे सुलभ होणार आहे, असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
*****