Home बातम्या ऐतिहासिक १०० सेकंद कोल्हापूर स्तब्ध : लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

१०० सेकंद कोल्हापूर स्तब्ध : लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

0
१०० सेकंद कोल्हापूर स्तब्ध : लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

कोल्हापूर, दि.6 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी अवघं कोल्हापूर 100 सेकंद स्तब्ध झालं.. आज शुक्रवारी सकाळी ठीक 10 वाजता जिथं आहे तिथं 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला कोल्हापूरकरांनी अनोखी मानवंदना देवून राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्याचं स्मरण केलं..

शाहू समाधी स्थळ येथे विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, एन.सी.सी.चे विद्यार्थी, नागरिक यांनी स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन केले.. श्री शाहू महाराज की जय ..! जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमला.

श्री शाहू समाधी स्थळ येथे श्री शाहू महाराज छत्रपती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती, राहुल पाटील, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे  यांच्यासह संपादक, विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहू प्रेमी, नागरिक, विद्यार्थी यांनी स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले.

लोकराजा शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूर 100 सेकंद स्तब्ध झाले. जिथे असेल त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी शाहू महाराजांना कोल्हापूरकरांनी मानवंदना दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्‍नलवर एस.टी. बसेस, अन्य वाहने, जाग्यावर थांबवण्यात आली. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी आणि नागरिकांनी उपक्रमात सहभागी होवून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.

जिल्ह्यातून 17 शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके आणि कोल्हापूर शहरातून पाच अशा एकूण 17 शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी आणण्यात आल्या. प्रारंभी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू ज्योती चे स्वागत केले.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या उत्साहाने शाहू प्रेमी कार्यकर्ते शाहू ज्योती घेऊन आले होते.शाहूवाडी येथून 45 किलोमीटर चे अंतर धावत ही शाहू ज्योत समाधी स्थळी आणण्यात आली.

कोल्हापूर शहरातील पाण्याचा खजिना येथून आणलेली शाहू ज्योत मिरजकर तिकटी, केशवराव भोसले नाट्यगृह, बिंदू चौक, शिवाजी पुतळा मार्गे समाधीस्थळी आली.

शाहू जन्म स्थळावरून कसबा बावडा येथील शाहू प्रेमींनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, महावीर कॉलेज, खानविलकर पंप यामार्गे तर नवीन राजवाडा या ठिकाणाहून महावीर कॉलेज मार्गे ही ज्योत  समाधीस्थळी पोहोचली.

रेल्वे स्टेशन वरुन दसरा चौक मार्गे कसबा बावडा फुटबॉल क्लबचे खेळाडू आणि कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे  कलाकार ज्योत  घेऊन आले.

शाहू मिल येथून बिंदु चौक, लक्ष्मीपुरी दसरा चौक मार्गे संयुक्त राजारामपुरीचे कार्यकर्ते ज्योत घेऊन आले. सोनतळी येथून वडणगे फुटबॉल क्लबचे खेळाडू आणि शाहू प्रेमींनी समाधी स्थळी मशाल आणली.

उपस्थितांसाठी पर्यावरणपूरक पद्धतीने चहा- नाश्ताचे वाटप

समाधी स्थळी सहज सेवा ट्रस्ट, छत्रपती शिव शाहू फाउंडेशन तर्फे शाहू समाधीस्थळी 5 हजार लोकांसाठी पर्यावरणपूरक पद्धतीने चहा नाश्ता वाटपाची सोय केली.

याठिकाणी प्लास्टिक ऐवजी पळसाच्या पानाचे द्रोण,  मातीचे कुलड, केळीच्या पानाचे चमचे आदी पर्यावरण पूरक साहित्य वापरण्यात आले.

कार्यक्रमाचे ड्रोन द्वारे चित्रीकरण

कृतज्ञता पर्वनिमित्त लोकराजाला 100 सेकंद आदरांजली वाहण्याच्या महत्वपूर्ण  उपक्रमाची क्षणचित्रे ड्रोनद्वारे टिपण्यात आली.

शहरातील प्रमुख 8 चौकातील उपक्रमाची क्षणचित्रे

कोल्हापूर शहर वासियांनी स्तब्धता पाळून लोकराजाला अभिवादन केले. याची क्षणचित्रे व छायाचित्रे टिपण्यात आली..

कृतज्ञता पर्व समितीचे नियोजन

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह कृतज्ञता पर्व समिती सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या अनोख्या उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले.

कार्यक्रमाचे संयोजन कृती समिती सदस्य उदय गायकवाड, इंद्रजित सावंत, प्राचार्य डॉ.महादेव नरके, प्रमोद पाटील , आदित्य बेडेकर, ऋषिकेश केसकर, प्राचार्य अजेय दळवी, अमरजा निंबाळकर,जयदीप मोरे, सुखदेव गिरी, प्रसन्ना मालेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील, विभागांतील मान्यवरांनी केले.

000