कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : वेळ सकाळची ….कोवळ्या उन्हाची किरणे अंगावर झेलत ..बाळगोपाळपासून ते आबालवृद्धांपर्यंत …प्रत्येक तालुक्यातून मोठ्या उत्साहाने शाहू प्रेमी, कार्यकर्ते गटागटाने शाहू -शिव ज्योती घेऊन समाधीस्थळी येत होते. प्रत्येकाच्या ठायी एकच भावना होती, मला माझ्या लोकराजाला वंदन करायचे आहे …माझ्या दिवगंत राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करायची आहे .. चैत्र पालवीने संपूर्ण संपूर्ण सृष्टी बहरावी तसे हे समाधीस्थळ शाहू प्रेमींच्या अपूर्व उत्साहाने, चैतन्याने बहरून गेले.
निमित्त होते …लोकराजा शाहू महाराज स्मृती शताब्दीचे …या शताब्दीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके आणि कोल्हापूर शहरातून पाच अशा एकूण 17 शाहू ज्योत आणण्यात आल्या. छत्रपती शाहू समाधीस्थळी (नर्सरी बाग) या ज्योतीचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी अगत्यपूर्व आणि मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
यावेळी लोकराजाला वंदन करण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, मधुरिमा राजे, युवराज कुमार शहाजीराजे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील, सर्वश्री खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सर्वश्री आमदार प्रकाश आबिटकर, जयंत आसगावकर, पी. एन. पाटील, राजू आवळे, राजेश पाटील, जयश्री जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील उपस्थित होते.
प्रारंभी कोल्हापूर शहरातील पाण्याचा खजिना येथून आणलेली शाहू ज्योत ही मिरजकर तिकटी, केशवराव भोसले नाट्यगृह, बिंदू चौक, शिवाजी पुतळा मार्गे समाधीस्थळी आली. त्यानंतर शाहू जन्मस्थळावरून कसबा बावडा येथील शाहू प्रेमींनी एस. पी. ऑफीस, महावीर कॉलेज, खानविलकर पंप या मार्गे ही ज्योत आणली तर नवीन राजवाडा या ठिकाणाहून महावीर कॉलेज मार्गे ही ज्योत समाधीस्थळी आली. रेल्वे स्टेशन येथून दसरा चौक मार्गे कसबा बावडा फुटबॉल क्लबचे खेळाडू व कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनचे कलाकार शाहू ज्योत घेऊन आले तर शाहू मिल येथून बिंदु चौक, लक्ष्मीपुरी, दसरा चौक मार्गे संयुक्त राजारामपुरीचे कार्यकर्ते ज्योत घेऊन आले. तसेच सोनतळी येथून वडणगे फुटबॉल क्लबचे खेळाडू आणि शाहू प्रेमींनी ही मशाल समाधी स्थळी आणली. त्यानंतर बरोबर १० वाजता सुमारे १०० सेंकद सर्व मान्यवरांनी या किर्तीमान, द्रष्ट्या लोकराजाला आदरांजली वाहिली .
000