नाशिक दिनांक 6 मे 2022 (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणा मार्फत 12 ते 14 मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वॉकेथॉन, योगा, क्रीडा, खाद्यमेळा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. हे कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित असलेल्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.
अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकारणाच्या वतीने सुरगाणा येथील हतगड किल्ल्याच्या पायथ्याशी 12 व 13 मे रोजी Eat Right मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच 14 मे रोजी महात्मा गांधी मैदान येथे सकाळी 6.30 ते 9.30 यावेळेत योगा शिबिर, वॉकेथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाच्या संचालिका प्रिती चौधरी यांनी बैठकीत दिली.
या पूर्व नियोजनाच्या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी. प्रत्यक्ष तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, निलेश श्रींगी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी, समाजसेवी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
000