कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या राजर्षी शाहूंच्या विचारांनी सांस्कृतिक कार्य विभाग कार्यरत
कोल्हापूर चित्रनगरी चित्रीकरणाचं आधुनिक स्थळ बनवण्यासाठी निधी देणार
लोकाभिमुख, कलाभिमुख, कलाकाराभिमुख सांस्कृतिक धोरणासाठी प्रयत्न
मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळवून देणार
कोल्हापूर, दि.6(जिमाका): मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करण्यासाठी तसेच कोल्हापूर चित्रनगरी चित्रीकरणाचं आधुनिक स्थळ बनवण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे १०१ वे स्मृती वर्ष तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षास अभिवादन करुन हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात या स्पर्धा होत आहेत.
विशेष वेशभूषा केलेले कलाकार व धनगरी ढोल ताशा व विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात अतिथी व प्रेक्षकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, सिने कलाकार किशोर कदम, परीक्षक, नाट्य कलाकार, प्रेक्षक उपस्थित होते.
कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी १७.१० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून सन २०२२- २०२३ साठीही ७ कोटी रुपयांच्या निधीची भरीव तरतूद करुन दिली आहे. कोल्हापूर चित्रनगरीच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी पहिल्यांदाच उपलब्ध झाला आहे. यापुढेही कोल्हापूर चित्रनगरी नावारुपाला येण्यासाठी अधिकाधिक निधी देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
श्री देशमुख म्हणाले, हीरकमहोत्सवी राज्य नाट्यस्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक जिल्ह्यांची मागणी असताना देखील राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सुरु असल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आग्रहास्तव कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांना कोल्हापूरकर निश्चितच भरभरुन प्रतिसाद देतील. कलेला राजाश्रय देण्याचे शाहू महाराजांचे कार्य पुढे घेवून जाण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध कला आणि कलाकारांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यात येत आहे. कलागुणांच्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून कलाकारांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येताहेत. अधिक लोकाभिमुख, कलाभिमुख आणि कलाकाराभिमुख सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा भर आहे. मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून थिएटर पॉलिसी तयार करण्याचाही राज्य शासनाचा विचार आहे. तालुक्यातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सांस्कृतिक संकुल बनायला हवे, असे सांगून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा तयार करण्यासाठीही प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवडलेल्या कलाकारांचे ऑडिशन घेऊन त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने प्रयत्न करावेत, असे सांगून या मंचावरून दिग्गज कलाकार घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कलाकारांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासारख्या वास्तू राज्याच्या कानाकोपऱ्यात उभ्या रहाव्यात. कोल्हापूर निसर्ग संपन्नतेने नटलेला असल्यामुळे अनेक मालिकांचे आणि चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी होत आहे. यातून सुमारे 5 हजार रोजगार निर्मिती होत असून आणखी वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. मुंबई, चेन्नई, हैद्राबाद अशा देशभरातील कलाकार कोल्हापूरमध्ये येण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. यादृष्टीने कोल्हापूर हून मुंबई, हैद्राबाद, चेन्नई या विमानसेवा नियमित सुरु राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील दुर्मिळ वाद्य हा राज्याचा ठेवा असून दुर्मिळ वाद्यांचे जागतिक पातळीवरील संग्रहालय बनायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विकासासाठी पुरातत्व विभागानेही निधी द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. अनेक कलाकारांना राजदरबारात राजाश्रय दिला म्हणूनच कोल्हापूर ही कलानगरी म्हणून ओळखली जाते. शाहू महाराजांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील. भालजी पेंढारकर, व्ही शांताराम यांचा वारसा कोल्हापूरला लाभला आहे. विविध मालिकांचे, चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापुरात होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी कलाकारांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरला भरभरून मदत दिली असल्याचे सांगून कोल्हापूर चित्रनगरीला वैभव मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री पाटील यांनी केली.
राज्य नाट्य स्पर्धेस शास्त्रीय संगीत व शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित पोवाड्यातून शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा देत सुरुवात करण्यात आली.
सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
000000