Home बातम्या ऐतिहासिक सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि.7 : मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला हक्काचे पाणी मिळणार आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, नागरी निवारा परिषद गोरेगांव येथे बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व निवासी रहिवाशांसाठी असणाऱ्या “सर्वांसाठी पाणी” धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सर्वश्री सुनिल प्रभू, राजहंस सिंह, रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ.इकबालसिंह चहल आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी “सर्वांसाठी पाणी !” धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पर्यावरणाची कमीत कमी हानी करून विकास कामे करावयाची आहेत. महानगरपालिकेची बेस्ट सेवा ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून वाहतूक,पाणी, आरोग्य सुविधा, महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा वाढविण्याच्या होत असलेल्या कामाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर करणे हा ऐतिहासिक क्षण- पालकमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई शहरामध्ये 16 विविध संस्था कार्यरत आहेत. या सर्वांना एकत्रित घेऊन मुंबई शहराला एक दिशा दिली आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर करणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

मुंबई 24 तास काम करणारी, स्वप्न बघणारी आणि ती पूर्ण करणारी आहे. ट्रान्स हार्बर लिंक, मालमत्ता करामध्ये सूट, सर्वांसाठी पाणी असे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांबरोबरच 2026 पर्यंत सुमारे तीन हजार इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत, असे अनेक निर्णय घेत शाश्वत विकास करत मुंबईला पुढे नेण्याचे काम होत असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

सर्वांसाठी पाणी हा कौतुकास्पद उपक्रम –प्रा. वर्षा गायकवाड

अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर पाणी ही मूलभूत गरज आहे. सर्वांसाठी पाणी हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

सर्वांसाठी पाणी धोरणाची उद्दिष्ट्ये

खासगी जमिनीवरील अघोषित झोपडपट्टीधारकांना पाणीपुरवठा करणे. तटीय नियमन क्षेत्रातील (सीआरझेड) झोपडपट्टी धारकांना सार्वजनिक नळ खांबाद्वारे पाणीपुरवठा करणे. क्षमापित निवासी इमारतींमधील अनधिकृत वाढीव बांधकामांना नळ जोडणी देणे. प्रकल्पबाधित झोपडपट्टी धारकांना पाणीपुरवठा करणे. निवासी इमारती किंवा त्यांचा काही भाग ज्याचे नकाशे मंजूर नाहीत, परंतु बांधकाम प्रारंभ पत्राशिवाय झाले आहे, त्यांना नळ जोडणी देणे ही या धोरणाची उद्दिष्टे आहेत.

000