नाशिक दिनांक 09 मे 2022 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियामानुकुल असल्यास अधिकृत करणेबाबत सकारात्मक विचार करून ती अधिकृत करण्याची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना राज्याचे कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, प्रांताधिकारी ईगतपुरी-त्र्यंबक तेजस चव्हाण, प्रांताधिकारी निफाड अर्चना पठारे, संदिप आहेर, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी , कार्यकारी अभियंता नाशिक महानगरपालिका संजय अग्रवाल आदिंसह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, तालुकास्तरीय शक्ती प्रदत समितीने सादर केलेल्या अहवालात मान्यता दिलेल्या पात्र 3 हजरा 91 अतिक्रमण धारकांची नावे संगणकीय प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्याचप्रमाणे गावठाण बाहेरील क्षेत्रातील एकूण 6 हजार 932 अतिक्रमण नियमित करण्यासाठी दुप्पट जागा देणे आवश्यक आहे. या दोन्ही बाबींचे प्रस्ताव शासनाकडे त्वरीत सादर करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित यंत्रणांना दिले आहेत. नाशिक महानगरपालिका अतिक्रमित जागांचे सर्वेक्षण सुरू करण्याचे व मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षण झालेल्या 16 भूखंडांची ड्रोनद्वारे मोजणी करण्याचे निर्देशही यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे. मिशन वात्सल्य अंतर्गत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना दिलेल्या लाभासंदर्भात आढावाही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी घेतला.
00