मुंबई, दि. १२:- अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या शिवसैनिक, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, आमदार रमेश लटके लढवय्या शिवसैनिक होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. त्याच जोरावर ते आता सलग दोनदा अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. चांगला संपर्क असणारा, विकास कामांचा ध्यास घेतलेला, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अकाली निधन हा त्यांच्या कुटुंबीयांवर आघात आहे. लटके कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आमदार रमेश लटके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
000