मुंबई, दि. 12 : राज्यातील खाजगी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांचे (VTI – Vocational Training Institute) विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही या विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी काल झालेल्या बैठकीत दिली.
बैठकीस कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघाचे पदाधिकारी यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. टोपे यांनी खाजगी व्यवसायिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींकडून संस्थांचे विविध प्रश्न, समस्या ऐकून घेतल्या. सर्व विषयांवर इत्यंभूत चर्चा करण्यात आली.
मंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्यातील सर्व व्हीटीआयकडून तरुणांना विविध प्रकारची अल्प मुदतीची प्रशिक्षणे दिली जातात. कौशल्य विकास विभागाचा हा एक चांगला कार्यक्रम आहे. युवकांना केंद्रस्थानी ठेवून सर्व प्रशिक्षणे प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. यासाठी सर्व खाजगी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांनी चांगल्या पद्धतीने कार्य करावे. या संस्थांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सर्व प्रश्न निर्धारित कालावधीत सोडविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संस्थांची प्रलंबित असलेली देयके त्वरित देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मंत्री श्री. टोपे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर खासगी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांशी संबंधित संकेतस्थळे अद्ययावत करणे, त्यावरील माहिती अद्ययावत करणे यासह आजच्या बैठकीत संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर विचार करून ते लवकरात लवकर सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिली.