मुंबई, दि. 12 :- आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या (ATDC) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे सोमवार, 16 मे रोजी सकाळी 10 कृषी पर्यटन विकासाशी संबंधित विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. कार्यक्रमात एका विशेष पुरस्कार सोहळ्याचे देखील आयोजन केलेले आहे. राज्यातील नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना या कार्यक्रमात पुरस्कृत केले जाईल.
कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते, म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. विविध क्षेत्रातील मार्गदर्शक, या कार्यक्रमात पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या नव्याने व वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत, ज्यांची माहिती करून घेण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन विभाग व कृषि पर्यटन विकास महामंडळाने केलेले आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंग, एमटीडीसी व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक श्री. मिलिंद बोरीकर आणि सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर तसेच कृषी पर्यटन विकास महामंडळ (एटीडीसी) चे सदस्य श्री पांडुरंग तावरे यांच्यासह सर्व विभागातील शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
कृषी पर्यटन क्षेत्रातील धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकरी जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतो. शेतीची कामे कशी चालतात त्याचा स्वतः अनुभव घेऊन निसर्गाशी मैत्री करण्याची संधी मिळते आणि निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते.
या उपक्रमाविषयी माहिती देताना विभागाच्या पर्यटन प्रधान सचिव, श्रीमती वल्सा नायर सिंग म्हणाल्या की, “2020 मध्ये धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून, गेल्या दोन वर्षांत केवळ ऑनलाइन कृषी पर्यटन परिषद झाली होती, यंदा परिस्थिती सुधारल्याने आणि उद्योगधंद्यांना संजीवनी मिळाल्याने, आम्ही प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित करत आहोत जिथे अनेक कृषी पर्यटन केंद्र संचालकांना कृषी पर्यटन विकासासाठीच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.”
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी कृषी-पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना असल्याचे म्हटले. “कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थार्जनाच्या संधी निर्माण होतील व गावांचा शाश्वत विकास होईल. आमचे 6 प्रादेशिक उपसंचालक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून संबंधित विभागात कृषी पर्यटन क्षेत्राची व्याप्ती आणि संधी समजावून सांगतील,” अशी माहिती संचालकांनी दिली.
राज्य कृषि व ग्रामीण पर्यटन समितीचे सदस्य पांडुरंग तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ३५४ कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत आहेत. हे धोरण राबवल्यापासून शेतकऱ्यांच्या रोजगारात 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. या कृषी पर्यटन केंद्रांवर 2018, 2019 आणि 2020 साली अनुक्रमे 4.7 लक्ष, 5.3 लक्ष आणि 7.9 लक्ष पर्यटक भेट देऊन गेले. या पर्यटक भेटींमधून शेतकऱ्यांना 55.79 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतकेच नाही तर कृषी पर्यटनातून विशेषतः ग्रामीण भागातील 1 लाख महिला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये असे अनुभवायला आले की कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांचे जीवन बदलेले नाही. तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागला आहे.