Home शहरे अकोला जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 12 : महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महात्मा जोतिराव फुले आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, संचालक डॉ. साधना तायडे, आदी उपस्थित होते.

श्री. टोपे म्हणाले, ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. ही योजना पूर्णपणे रुग्णकेंद्रीत करण्यासाठीचा प्रयत्न आहे.या योजनेत समावेश नसलेल्या उपचारांचा समावेश कशा पध्दतीने करता येईल यावर विचार केला जाईल.

धर्मादाय रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. यासाठी धर्मादाय कायद्यातील कलमात आवश्यक बदल करुन या योजनेसाठी किमान तीस टक्के खाटा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करु, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धर्मादाय दवाखान्यातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काय करता येईल यावर विचार केला जाईल, असे सांगितले. दिव्यांग नागरिकांना तालुका स्तरावर दाखले देण्यासाठी व्यवस्था केली जावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

तत्पूर्वी जन आरोग्य योजनेच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा होवून तज्ज्ञांनी आपली मते मांडली.