Home बातम्या ऐतिहासिक पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवा – विभागीय आयुक्त

पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवा – विभागीय आयुक्त

0
पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवा – विभागीय आयुक्त

नागपूर, दि. 12 : हवामान विभागाकडून मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्या  बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक कमांडर सुरेश कराळे, कृष्णा सोनटक्के, हवामान विभागाचे एम. एल. साहू तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (चंद्रपूर), संदीप कदम (भंडारा), संजय मीणा (गडचिरोली) विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

सिंचन प्रकल्पांमधून पुराचे पाणी सोडताना नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त डॉ. खोडे-चवरे म्हणाल्या, माजी मालगुजारी तलावांचे पाणी साठवण बांधाबाबत ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घ्यावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्यात. मागील वर्षी पुरामुळे बाधित झालेली गावे तसेच पूर नियंत्रण रेषेनुसार बाधित होणाऱ्या गावांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून ‘मॉक ड्रिल’ आयोजित करावे, यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणा उपस्थित राहतील, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

जिल्हा तसेच तालुकास्तरावरील नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहतील तसेच या नियंत्रण कक्षांमध्ये आवश्यक माहितीसह तात्काळ प्रतिसाद मिळेल, याची खबरदारी घ्यावी. आंतरराज्य वाहणाऱ्या नद्यांसंदर्भात पावसाचे तसेच पुराच्या माहितीचे आदान-प्रदान करावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा. आपत्ती निवारणासाठीचे सर्व साहित्य सुस्थितीत व तात्काळ वापरता येईल, असे ठेवावेत, असे निर्देश  विभागीय आयुक्तांनी दिले.

पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे लाईफ जॅकेट, रबर बोट, सर्च लाईट, मेगा फोन, तंबू, दोर, विजेरी, होंडा पंप, इलेक्ट्रिक जनरेटर, फायर सूट, फोल्डिंग स्ट्रेचर, प्रथम उपचार पेटी इत्यादी अत्यावश्यक साधनांची  जिल्हानिहाय माहिती देण्यात आली.

शेतपीक, फळपीक नुकसानीसंदर्भातही आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच पुरामुळे नुकसान झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल तयार करण्याला प्राधान्य द्यावे. तात्काळ उपाययोजनेच्यासंदर्भात शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा. तसेच कर्मचाऱ्यांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात यावे. एसडीआरएफतर्फे जिल्हास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, असे निर्देशही डॉ. खोडे-चवरे यांनी दिले.

नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित, वित्त आणि पर्यावरणाचे नुकसान होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय सुसज्जता आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीडितांना ताबडतोब मदत मिळेल यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहणे आवश्यक आहे. अतिवृष्टीच्या काळात कित्येकदा वीज प्रवाह खंडित होवून जनजीवन विस्कळीत होते. यासाठी पर्यायी विजेची व्यवस्था तयार ठेवावी. जेणेकरून मदत आणि बचाव कार्यात अडसर निर्माण होणार नाही. पूर प्रवण परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी त्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा अद्ययावत असावी. गरजूंना वैद्यकीय मदत, खाद्य पदार्थांचा पुरवठा, पिण्याचे पाणी, कपडे, दळणवळण पूर्व स्थितीत आणणे तसेच आर्थिक किंवा वस्तू रुपातील मदतीच्या वाटपाबाबत विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात साथीचे आजार झपाट्याने वाढतात. त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी  यावेळी चर्चा करण्यात आली. आपापल्या जिल्ह्यातील हेलीपॅड तयार ठेवावेत, असे  विभागीय  आयुक्तांनी सांगितले.