नांदेड, (जिमाका) दि. 14 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज येथील सामाजिक न्याय भवन येथे भेट दिली. सामाजिक न्याय भवनच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून (एसटीपी) फुलविण्यात आलेल्या परिसरातील बगीचाची पाहणी त्यांनी केली. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नांदेड शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी हे एसटीपी प्रकल्प बसविण्यात आले असून पाण्याच्या पुनर्वापराचा नवा मापदंड निर्माण केला आहे. नाविन्यपूर्ण अशा या प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून त्यांनी अधिक माहिती समजून घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, संशोधन अधिकारी आनंद कुंभारगावे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सामाजिक न्याय भवनात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. त्याचबरोबर डिजिटल स्टँडीद्वारे शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार होण्याच्या विविध विभागांना दिल्या जाणाऱ्या डिजिटल स्टँडीचेही त्यांनी अवलोकन केले.