रत्नागिरी दि. 19 : शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या अनेक योजना आहेत, त्या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल अभियानावर आधारित शेती करावी, असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नकृषी महोत्सव व पशूपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
येथील प्रमोद महाजन क्रिडा संकूल येथील मैदानावर आयोजित महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यानंतर शेतकरी सन्मान सोहळयात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील हे होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कऱ्हाडे तसेच जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त धनंजय जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा कृषी कार्यालय, जिल्हा परिषद, रत्नागिरी आणि जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय यांनी संयुक्तरित्या याचे आयोजन केले आहे. या ठिकाणी 120 स्टॉल लावण्यात आले असून कोकणी खाद्यपदार्थ तसेच परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत.
कोकणातील शेतकरी कायमच प्रगतीशील राहिलेला आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने थेट ग्राहकांपर्यंत जाण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खा. राऊत यांनी केले.
रत्नागिरी जिल्हयातील शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. इथला शेतकरी चांगल्या पध्दतीची शेती करतो. याला तंत्राची जोड मिळाली तर अधिक चांगली शेती शक्य होणार आहे. खते आणि बियाणांचा योग्य वापर आणि उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत नेता आले तर शेतकरी अधिक संपन्न होईल असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यावेळी म्हणाले.
माती परिक्षण
शेतीसाठी माती चे परिक्षण करुन त्याद्वारे खते आणि बियाणे यांची योग्य मात्रा ठरवता येते.यासाठी जिल्हयात माती परिक्षण प्रयोगशाळा कार्यक्षम करणे आवश्यक आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कऱ्हाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या मागणीचा आपण नक्कीच पाठपुरवठा करु असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले.
खासदार राऊत यांच्या हस्ते फित कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. मुख्य सोहळयात बळीराजाच्या फोटोला पूष्पहार अर्पण करुन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन सुरुवात झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पशूसंवर्धन उपायुक्त धनंजय जगदाळे यांनी केले.
हे प्रदर्शन 3 दिवस सुरु राहणार आहे.
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार
याप्रसंगी कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी हरिश्चंद्र धोंडू शिगवण, कुंभवे, ता. दापोली, मिलिंद दिनकर वैद्य, रीळ, ता. रत्नागिरी, शेखर शिवाजीराव विचारे, वरवेली, ता. गुहागर यांचा मान्यंवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खरीप हंगाम भात पिक स्पर्धा 2021-22 जिल्हयातील उच्च उत्पादन घेणारे शेतकरी शांताराम सादू खापरे, शेडवई ता.मंडणगड, विलास कृष्णा किंजळे, वाटद, ता. रत्नागिरी, वसंत सोनू घरवे, निगडे, ता. दापोली, आत्माराम भिकाजी गोनबरे, भगवतीनगर, ता. रत्नागिरी, चंद्रकांत हरिचंद्र जान्स्कर, कोतापूर, ता. राजापूर, सुर्यकांत बाळू दाभिळकर, चिंचाळी, ता. दापोली यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
20 मे रोजीचे कार्यक्रम
रत्नकृषी महोत्सवात शनिवार 20 मे रोजी सकाळी 11 ते 12.30 वा. या वेळेत कृषी पणन मंडळाकरिता संधी या विषयावर सहाय्यक सरव्यवस्थापक मिलींद जोशी शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत. त्यानंतर 3 ते 5 वा. यावेळेत मत्सप्रक्रिया व मुस्यवर्धन याबाबत मत्स्य महाविद्यालय शिरगाव तर्फे माहिती देण्यात येणार आहे.
सांयकाळी 07 ते 10 या वेळेत महाराष्ट्र व कोकणातील लोककला याबाबत सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत.
रविवार 21 मे रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत जिल्हा संसाधन व्यक्ती शेखर विचारे आणि अग्रणी बँक व्यवस्थापक एन.डी. पाटील हे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या बाबत मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी 3 ते 5 यावेळेत समारोप सोहळा होईल.