Home शहरे अकोला कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात प्रथम अवयवदान

कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात प्रथम अवयवदान

0
कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात प्रथम अवयवदान

मुंबई, दि. 19 :- कोविड-१९ नंतर मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील प्रथम अवयवदान जे.जे. रूग्णालयात काल करण्यात आले असून समाजसेविका ॲड. रिना बनसोडे यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला आणि समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे, ॲड. बनसोडे यांच्या अवयवदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

मुंबईच्या  अॅडव्होकेट रिना बनसोडे (वय ४३ वर्षे) यांनाजे. जे. रुग्णालयात १५ मे पासून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मेंदू सर्जरी विभागप्रमुख  डॉ.वर्णन वेलहो यांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत होते.  काल १८ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी श्रीमती बनसोडे यांना ब्रेन डेड घोषित केले होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना समाजसेवा विभागामार्फत  संपूर्ण माहिती देऊन अवयवदानाबद्दल अवगत करण्यात आले. अवयवदानासाठी  रुग्णाच्या नातेवाईकांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या टिमने अवयवदानाची प्रक्रिया लगेचच सुरु केली. रुग्णाच्या किडनी, कॉर्निया, हृदय तसेच छोटे आतडे यांचे दान झाले. मुंबईमधील जे. जे. हॉस्पीटल, ग्लोबल हॉस्पीटल, कोकीलाबेन हॉस्पीटल, नानावटी हॉस्पीटल येथील गरजु रुग्णांना नियमानुसार हे अवयव देण्यात आले. विशेष म्हणजे मुंबईतील हे पहिलेच यशस्वीरित्या झालेले छोट्या आतड्याचे अवयव दान आहे. ज्या रुग्णालयात अवयवदान झालेले छोटे आतडे दिले त्या हॉस्पीटलमधील गरजू रुग्णाला छोटया आतड्याची अत्यंत आवश्यकता होती आणि हे छोटे आतडे लगेचच मिळाल्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या रुग्णास लाभ झाला असे सूत्रांनी सांगितले. झेडटीसीसीच्या नियम आणि मार्गदर्शक सुचनेनुसार कोवीड-१९ नंतर मुंबईमधील सार्वजनिक रुग्णालयामध्ये झालेले हे पहिलेच अवयवदान आहे. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या मृत्युनंतरही आपण इतरांचे जीवन वाचवू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण समाजसेविका असलेल्या अॅड. रिना बनसोडे यांनी जगाचा निरोप घेताना समाजासमोर  ठेवून गेल्या. त्यांच्या नातेवाईकांनीही या अवयवदानात मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/