Home बातम्या ऐतिहासिक सिंदखेड राजा विकास आराखडा करताना स्थानिकांचे सहकार्य घ्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

सिंदखेड राजा विकास आराखडा करताना स्थानिकांचे सहकार्य घ्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सिंदखेड राजा विकास आराखडा करताना स्थानिकांचे सहकार्य घ्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 :  राष्ट्रमाता माँ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेला सिंदखेड राजा चा विकास करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र हा विकास करताना स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेऊन विकास आराखडा करावा. येथील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र जी कामे होतील ती उत्कृष्ट दर्जाची व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

सिंदखेड राजा येथील पंचायत समिती सभागृहात सिंदखेड राजा विकास आराखडा आणि जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार किरण सरनाईक, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती,  मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अॅड नाझेर काझी आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले,  सिंदखेड राजा चा विकास करताना निश्चित असा आराखडा तयार करावा आणि त्यानुसारच विकास कामे करावी.  येथील विकास कामे करताना पुरातत्त्व विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार येथील वास्तूंचे संवर्धन व्हावे.  या ठिकाणचा सर्वांगीण विकास झाल्यास येथील चित्र पालटून याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील.  त्यांच्यासाठी चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उभे राहण्याचे कार्य विकास आराखड्यातून व्हावे. या ठिकाणी होत असलेल्या विकासामुळे पर्यटकांना सर्व पर्यटन करायला दोन दिवसांचा वेळ लागेल.  त्यानुसार त्यांच्या निवासाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. पर्यटन स्थळांचा विकास होण्याअगोदरच या स्थळांच्या लगतचे अतिक्रमण काढावे. तसेच जमीन अधिग्रहण तातडीने करावे.

ते पुढे म्हणाले, सिंदखेड राजा येथे पर्यटनाच्या निमित्ताने व्यवसायांना उर्जितावस्था प्राप्त होणार असून लोणार- शेगाव अशी स्थळे ही सिंदखेड राजाला जोडण्यात यावी. पर्यटन स्थळांचा विकास करताना स्थानिकांची मदत घ्यावी. तसेच ही कामे उत्कृष्ट दर्जाची असावीत यावर भर द्यावा.  सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन करताना या वास्तू पुन्हा खराब होणार नाही. या दृष्टीने ही कामे करावी. जिजाऊंचे जन्मस्थळ असल्याने शक्य असेल तेवढा निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी मराठी,  हिंदी आणि इंग्रजी भाषेतील माहिती फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

विकास आराखड्याच्या बैठकीमध्ये तेरा ऐतिहासिक वास्तू यांच्यासह वस्तुसंग्रहालय, विश्राम गृह, बंदिस्त नाली, वाहनतळ शहराचा बाह्यवळण रस्ता ही विकासकामे करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वव्हाणे आणि केंद्रीय पुरातत्व विभागाचे श्री. अंगातईकर यांनी सिंदखेड राजा येथे पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती दिली. तसेच मुख्याधिकारी श्री. व्हटकर यांनी अन्य विभागांच्या प्रस्तावित विकास कामांचे सादरीकरण केले. बैठकीचे संचलन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले. बैठकीला विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पंचायत समिती सभागृहात घेतला.  श्री पवार यांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिक कर्ज वेळेत मिळावे. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज देण्यासाठी उद्युक्त करावे. तसेच बियाणे खते उपलब्धता याबाबत कृषी विभागाने सतर्क राहून कार्य करावे. शेतकऱ्यांना शेततळ्यांसाठी अनुदान पंच्याहत्तर हजारावर करण्यात आले आहे. त्याचाही लाभ देण्यात यावा. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही करण्यात यावी. जिगाव प्रकल्पाला आवश्यक तो निधी देण्यात येत असून त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. या वर्षीपासून या प्रकल्पातून जलसंचय होईल, ती कामे तातडीने पूर्ण करावे

सार्वजनिक बांधकाम विभागाने कामे करताना ही कामे दर्जेदार होईल, यासाठी प्रयत्न करावे. राष्ट्रीय महामार्ग रोजगार हमी योजना, ग्रामीण पाणीपुरवठा यासह शाळा आणि अंगणवाडी यांना केंद्राचा निधी मिळत आहे. त्यामुळे या कामी सातत्याने पाठपुरावा करून केंद्राचा जास्तीत जास्त निधी जिल्ह्याच्या विकास कामासाठी उपयोगी आणावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेचा निधी राज्य स्तरावरूनच कमी करण्यात आलेला आहे. मात्र जिल्ह्यात शासनाच्या किमतीनुसार शेतजमीन उपलब्ध होत असल्यास आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शिष्यवृत्तीचा निधी देताना विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय ही राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे 15 व्या वित्त आयोगातून शाळा आणि अंगणवाड्यांची कामे प्रामुख्याने करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी याबाबतची जास्तीत जास्त कामे वित्त आयोगाच्या निधीतून करावीत .

बैठकीनंतर यांनी  समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजा इंटरचेंज येथील बाल शिवबा आणि जिजामाता यांचा ज्या ठिकाणी पुतळा प्रस्तावित आहे. त्या जागेची पाहणी केली, हा पुतळा उभारताना वाहतुकीला कोणतीही बाधा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. सदर पुतळा रस्ते विकास महामंडळामार्फत बसविणे बाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत सबंधित विभाग प्रमुखाने आपल्या विभागाशी संबंधित माहितीचे सादरीकरण केले.