पुणे दि.२७- प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसिस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
विधानभवन येथे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ‘गॅप ॲनालिसिस’ योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी श्री.पवार यांनी केली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, जिल्हा परिषदेचा स्वनिधी, सामाजिक संस्थांनी केलेली मदत, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्यसेवेसाठी आवश्यक असलेल्या या उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवरच अद्ययावत उपचार उपलब्ध करून देणे शक्य होईल आणि गोरगरिबांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल. जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
वैद्यकीय उपचारांसाठी अत्याधुनिक यंत्रणा, उपकरणांप्रमाणेच तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीदेखील आवश्यकता असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.
रुग्णसेवा ही मानवसेवा मानून काम करा
कोरोनाकाळात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे सांगून श्री.पवार म्हणाले, डॉक्टर, परिचारीका आणि इतर कर्मचारी केवळ तज्ञ असणे पुरेसे नसून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. रुग्णसेवा ही मानवसेवा, ईश्वरसेवा मानून काम केलं पाहिजे. वैद्यकीय सेवा हा व्यवसाय कमी आणि सेवाकार्य अधिक आहे, हे लक्षात ठेवावे.
कोरोना संकटामुळे आरोग्यसेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे महत्त्व देशाला लक्षात आले. त्यादृष्टीचे उत्तम दर्जाची उपकरणे प्राथमिक आरोग्य केंद्राना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुणे जिल्हा परिषदेनं आरोग्य सेवेसाठी खरेदी केलेल्या अद्ययावत उपकरणांची माहिती नागरिकांना व्हावी आणि नागरिकांमध्ये आरोग्यसेवेबद्दल विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने आयोजित केलेले हे प्रदर्शन आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणाऱ्या सुविधा
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी ९ खासगी कंपन्यांनी १७ कोटी ६० लक्ष रुपयांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी दिला असून त्यातून एकूण १०२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण शक्य झाले आहे. जिल्हा परिषद स्वनिधीतून ४ कोटी २५ लाख रुपये देण्यात आले असून त्यातून ५४ आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात आले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक दुरूस्तीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे ‘सेवा कमतरता विश्लेषण’ करण्यात आले. त्यानुसार समितीकडून ४ कोटी ८९ लाख रुपये प्राप्त झाले असून त्यातून ४८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात आले आहे. प्रदर्शनात २५२ प्रकारच्या आरोग्य विषयक साहित्य मांडण्यात आली होती.
जिल्हा परिषदेच्या ॲपचे उद्घाटन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेने तयार केलेल्या १० लाखाच्या आतील कामापैकी सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संघांना देण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे आणि सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेच्या कामाची माहिती करून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘माझी जिल्हा परिषद-माझे अधिकार’ या ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायत प्रशिक्षण केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘ग्रामपंचायत प्रशिक्षण’ आणि ‘विभागीय चौकशी मॅन्युअल’ या पुस्तिकांचेही यावेळी यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजातील सुधारणांची माहिती दिली.