Home बातम्या ऐतिहासिक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अनेक कामांना चालना – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अनेक कामांना चालना – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अनेक कामांना चालना – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 27 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अनेक कामांना चालना मिळाली असून, ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहे. यापुढेही अधिकाधिक कामे हाती घेण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सुमारे साडेआठ कोटी रू. निधीतून विविध रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी जि. प. सभापती बाळासाहेब हिंगणीकर, हरिभाऊ मोहोड यांच्यासह बांधकाम अभियंता, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रावळगाव मुकुंदपूर येथे दोन कोटी 27 लक्ष रु. निधीतून डांबरी रस्त्याचे, तसेच 35 लक्ष रु. निधीतून येसुर्णा बस स्थानक ते गावापर्यंत आणि सुमारे अडीच कोटी रुपये निधीतून येसुरणा ते सावळी खुर्द डांबरी रस्त्याचे, एकूण 95 लक्ष रु. निधीतून कोल्हा ते नरसिंगपूर, तर 30 लक्ष रु.निधीतून इसापुर ते वडनेर भुजंग रस्त्याचे भूमिपूजन यावेळी झाले.

त्याचप्रमाणे, 50 लक्ष रु. निधीतून बोराळा येथे राज्य मार्ग 24 पासून पथ्रोट, जवळापूर,  बोराळा, धनेगाव रामा-308 पर्यंत नाली व काँक्रिट रस्त्याचे आणि 1 कोटी 38 लक्ष रुपये निधीतून पांढरी खानमपूर येथे पांढरी ते वाघनेर या रस्ता कामाचे भूमिपूजन झाले.

जिल्ह्यात रस्त्यांची अनेक कामे पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे. ही सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. ती गुणवत्तापूर्ण असावीत. चांगले रस्तेनिर्मितीमुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. इतरही आवश्यक रस्ते सुधारणेच्या कामांबाबत तत्काळ प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

000