Home बातम्या ऐतिहासिक शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे – महासंवाद

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे – महासंवाद

0
शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे – महासंवाद

पुणे दि.२९:राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून विविध योजना आणि कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन केले जात आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढीसह कृषी उत्पादन वाढविण्यासाठी पशुसवंर्धन विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले.

पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने आयोजित पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आर. टी. वझरकर, उपाध्यक्ष डॉ.रामनाथ सडेकर, सचिव डॉ. वि. वै.देशपांडे उपस्थित होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या,  ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकरी, शेजमजुराला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आवश्यक आहे, शेळीपालन हा त्यावर महत्वाचा पर्याय आहे. दुष्काळी भागात शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी शेळीपालन महत्त्वाचा पर्याय असल्याने शेळीपालनाला प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेळीपालन करताना चारा व खाद्य व्यवस्था महत्वाची आहे. शेळीपालनाला महिला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पशुसंवर्धन विभागाने महिलांना मार्गदर्शन आणि साहाय्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, याबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पशुवैद्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून पथदर्शी कार्य सुरू असल्याचा उल्लेख करून डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, पशुवैद्यकाचे योगदान मोठे आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात त्यांनी केलेले संशोधनही अत्यंत महत्वपूर्ण आहे. पशुसंवर्धन क्षेत्रातील उद्योजक तसेच या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी यापुढेही अधिकाधिक योगदान द्यावे. पशुवैद्य प्रतिष्ठानच्या कार्यासाठी तसेच पशुवैद्यकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल,असेही त्या म्हणाल्या.

कोरोना कालावधीत राज्यांतील अनेक महिलांचे पती गमावले आहेत, त्यातील शेतकरी महिलांना खते व बियाणे मोफत देण्याची मागणी केली आहे, त्याला सर्वच यंत्रणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले. यावेळी प्राणी आणि पाणी संदर्भातील स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पशुसंवर्धन क्षेत्रात सुरू असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी पशुवैद्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

0000