Home शहरे अकोला ‘यूपीएससी’ परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

‘यूपीएससी’ परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

0
‘यूपीएससी’ परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 30 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेच्या निकालात मराठी मुला-मुलींच्या वाढलेल्या टक्क्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळालेले यश हे तुमच्या कठोर परिश्रमांचे, देशसेवेच्या विचारांवरील निष्ठेचे फळ आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना यापुढच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कल्याण आणि व्यापक देशहित लक्षात घेऊनच आपण निर्णय घ्याल, असा मला विश्वास आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतच्या या प्रवासात तुम्हाला साथ दिलेल्या गुरुजनांचे, पालकांचे, मार्गदर्शकांचे, मित्रांचे, हितचिंतकांचेही मी यानिमित्ताने अभिनंदन करतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठी प्रशिक्षण देणाऱ्या राज्यातील शासनाच्या प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांचेही यामध्ये मोलाचे योगदान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.