Home बातम्या ऐतिहासिक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती, उत्कृष्ट उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करावा – राज्यमंत्री बच्चू कडू

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती, उत्कृष्ट उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करावा – राज्यमंत्री बच्चू कडू

0
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती, उत्कृष्ट उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करावा – राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती, दि. 1 (विमाका) :  शेतकऱ्यांनी  उगवण क्षमतेची खात्रीशीररित्या तपासणी केलेले घरचे बियाणे वापरावे. बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना खात्रीशीर व उत्कृष्ट उगवणक्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणार असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.

चांदुर बाजार येथील प्रहार कार्यालयाच्या प्रांगणात बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान, चांदुर बाजारच्या तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननिर, अचलपूरच्या तालुका कृषि अधिकारी स्नेहल ढेंबरे आदी उपस्थित होते.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बियाणे घरीच तयार करावे. याबाबत शास्त्रीय पद्धतीने बियाणे तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात येणार असल्याचे श्री. कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी उत्कृष्ट उगवणक्षमता असलेले बियाणे घरीच तयार करुन बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून ही चळवळ राबवावी. बीज उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरविणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री श्री कडू यांनी यावेळी दिली.

महोत्सवाचे वैशिष्ट्य

बियाणे महोत्सवात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ बियाणे विक्रीसाठी सहभागी झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे नाही त्यांच्यासाठी घरचे उत्पादित केलेले दर्जेदार बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. शेतकरी बांधवांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कांदा, भुईमुंग, भाजीपाला व इतर बियाणे वाजवी दरात उपलब्ध केली होती.

महोत्सवात अनेक स्टॉल्सचा समावेश

महोत्सवात बेलोरा बीजोत्पादक व शेतकरी उत्पादन कंपनी व कृषी विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले. कल्चरयंत्र म्हणजेच पेरणीपूर्वी बियाण्यांवर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया यंत्राच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.  शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या प्रतवारी प्रक्रियेची यावेळी माहिती घेतली. बीजप्रक्रियेसाठी ड्रमची व्यवस्था व औषध उपलब्ध यावेळी करून देण्यात आले. शेतकऱ्यांना वाजवी दरात बीजप्रक्रिया करून देण्याची सुविधा महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, जैविक बीजप्रक्रियेसाठी स्टॉल उभारण्यात आले होते. विविध जैविक बीजप्रक्रिया साहित्य विक्रीसाठी येथे उपलब्ध होते. तळवेलचे प्रगतिशील शेतकरी भालचंद्र बोंडे, बेलोराचे शेतकरी विजय कडू आदी उपस्थित होते.

उगवण क्षमतेची चाचणी होणार

शेतकऱ्यांना आपल्या जवळील बियाणे विक्री करण्यासाठी  त्यांच्या जवळील ट्रेमध्ये उगवणक्षम बियाण्यांची माहिती देण्यासाठी व तपासणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या ट्रे मध्ये विविध पिकांच्या बियाण्यांच्या उगवणीबाबत माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.