Home शहरे अकोला सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध –  पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध –  पालकमंत्री दत्तात्रय भरणे

0
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध –  पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर, दि.4(जिमाका):- सोलापूर शहरातील नागरिकांना चार दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत असल्याबाबतचे दुःख आहे. लवकरच सोलापूर शहरासह बार्शी व मंगळवेढा पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न मार्गी लावून त्या त्या भागातील नागरिकांना रोजच्या रोज पाणी मिळेल, याची दक्षता घेण्यात येईल. पालकमंत्री म्हणून सोलापूरकरांनी नोंद घ्यावी, असे काम करण्याबरोबरच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

दैनिक पुण्यनगरीच्या 19व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘डंका सोलापूरचा सन्मान भुमिपुत्राचा’ या कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात आले होते, त्याप्रसंगी पालकमंत्री भरणे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, बबनदादा शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धैर्यशील मोहिते-पाटील, प्रवीण शिंगोटे व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्यासाठी तत्पर आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद ठेवावी अशी कामे जिल्ह्यात करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. बार्शी व मंगळवेढा पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या योजना लवकरच मंजूर होऊन या भागातील नागरिकांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

सोलापूर जिल्हयाचा पालकमंत्री झाल्यापासून आपण जिल्ह्यात अनेक  विकासात्मक कामे मार्गी लावलेली आहेत. त्याबरोबरच कोरोनाच्या काळात खाजगी ओपीडी सुरू व्हाव्यात यासाठी डॉक्टरांचे मनपरिवर्तन केले व जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय वैद्यकीय सेवेबरोबरच खाजगी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.  सामान्य प्रशासन विभागाचा राज्यमंत्री म्हणून राज्यसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्‍न शासन स्तरावर मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले व विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच डंका सोलापूरचा सत्कार भूमिपुत्रांचा याअंतर्गत सत्कार झालेल्या सर्व सत्कारमूर्तीने अधिक जबाबदारीने काम करून  जिल्ह्याच्या विकासात भर घालावी असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकारितेचे मार्गदर्शक तत्त्वे पाळूनच पुण्यनगरीने पत्रकारिता केली आहे. त्यांच्या पत्रकारितेत पित पत्रकारितेला थारा नाही, असे सांगून माजी केंद्रीय मंत्री श्री शिंदे यांनी  यापुढील काळातही सर्व माध्यमांनी लोकजागृतीचे काम असेच करत राहावे, असे आवाहन केले. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तीस वर्षापूर्वी 120 किलोमीटरवरून पाणी आणले होते, अशी माहिती दिली. त्या त्या काळातील नेतृत्वाने सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केलेले होते व यापुढील काळात नवीन तरुण नेतृत्व विविध विकासात्मक योजना राबवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार बबनदादा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कार मूर्तीच्या वतीने संदीप भाजीभाकरे व श्रीमती शितलदेवी मोहिते-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पुण्यनगरीच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. वर्धापन दिनानिमित्त सर्व मान्यवरांनी पुण्यनगरी परिवाराला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शशिकांत बोदडे यांनी केले तर आभार सचिन गाडेकर यांनी मानले.

सत्कारमूर्ती :-

  1. श्री बालाजी मंजुळे, आयुक्त राज्य ग्रामीण विकास संस्था आंध्रप्रदेश 2. डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त पश्चिम रेल्वे मुंबई 3)स्वप्नील पाटील जॉइंट कमिशनर आयकर विभाग हैदराबाद 4)सौ. सुवर्णा माने झोळ, उपवनसंरक्षक अहमदनगर 5)डॉ. शिवाजी घोलप, प्रोफेसर आयआयटी दिल्ली 6)सौ.शितलदेवी मोहिते-पाटील, संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर माँम फाउंडेशन,7. पुरुषोत्तम राजिमवाले, संस्थापक विश्व फाउंडेशन शिवपुरी 8.श्री आशिष कोठारी, संचालक कोठारी उद्योग समूह 9. साजन बेंद्रे प्रसिद्ध गायक 10)महेश बिराजदार संस्थापक आरोग्य अमृततुल्य 11)शशिकांत धोत्रे जागतिक चित्रकार 12.शिवशंकर आयुक्त सोलापूर महापालिका व विशेष सन्मानार्थीमध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर तालुका माढाचे चेअरमन बबनराव शिंदे व सोलापूर महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त धनराज पांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.