नागपूर दि. 06 : छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यकारभारातून रयतेच्या सर्वसमावेशक लोककल्याणकारी प्रशासनाचा वस्तूपाठ घालून दिला आहे. त्याच मार्गाने आम्ही सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागपूर जिल्हा परिषदेमध्ये शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रशमी बर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपाआयुक्त रेड्डी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
अठरापगड जातीच्या बळावर निर्माण केलेले सुराज्य, महिला,अबला यांच्या संरक्षणाची हमी, सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार आणि समान न्यायाची भूमिका छत्रपतींच्या राज्यकारभाराचे वैभव होते. रयतेचे राज्य असे सामान्य जनता स्वतः म्हणायची. हाच वस्तूपाठ आमच्या पुढे असून याच मार्गाने शासन प्रशासनाची वाटचाल असावी, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
तत्पूर्वी त्यांनी याठिकाणी उभारलेल्या शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी शाळकरी मुलांनी छत्रपती शिवराय व मावळ्यांचा वेष धारण केला होता.पालकमंत्र्यांनी त्यांच्या सोबत छायाचित्र घेतले. जिल्हा परिषदेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी त्यांनी नंतर संवाद साधला.
पाणंद रस्ते, शाळांचे डिजिटायझेशन, रोजगार मेळाव्याचे आयोजन तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी चर्चा करताना घेतला.
00000