अलिबाग, दि.08 (जिमाका):- गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांनी आज तळीये येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तळीये दुर्घटनाग्रस्तांसाठी सुरू असलेल्या पुनर्वसन कामाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांनी कंटेनर घरांची पाहणी केली. तसेच पुनर्वसित गावासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पाणी, रस्ते, वीज, वृक्षारोपण इत्यादी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी तळीये दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन महाजन, मुख्य अभियंता श्री. जाधव, म्हाडाचे कार्यकारी अभियंता श्री फाये,जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता श्री.बारदस्कर, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्री.मोहिरे, जिल्हा परिषद माजी सदस्य मनोज काळीजकर, सरपंच श्री.संपत तांदळेकर, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, ट्रान्सकाॅन डेव्हलपर्स चे श्री सुदिप्ता दास तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड म्हाणाले की, घरांसाठी जमीन निवडताना योग्य जमीन निवडावी लागते. कारण इथली जी नैसर्गिक जमीन आहे ती लाल मातीची आहे आणि जो धोका मागच्या वर्षी झाला तो मातीत असलेल्या घरांमुळे झाला. माती ढासळण्याचा धोका निसर्गतः असतो. त्यामुळे त्याचा विचार करणे अत्यावश्यक आहे.
गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, सर्व तज्ञांचे मत घेऊन, वेगवेगळ्या ठिकाणांची जागा एकत्र करून जवळपास 17-18 हेक्टर जागा घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 627 स्क्वेअर फुटांचे घर आहे. जवळपास तीन ते चार गुंठ्यांचा प्लॉट दिला जाईल. त्या प्लॉटला भिंती घातल्या जातील आणि प्लॉट त्यांच्या मालकीचा केला जाईल.
पाणीपुरवठ्यासाठी सरस्वती नदीतून पाणी उचलणार आहोत आणि या गावाला स्वतंत्र पाणीपुरवठा देणार आहोत. येथे अंगणवाडी, खेळाचे मैदान, जिल्हा परिषदेची शाळा, मंदिर, बौद्धविहार असेल असे सांगून एकूणच समाजाच्या राहणीमानाला उपयुक्त असे हे गाव निर्माण केले जाईल. त्याला कोकणाची छाप असेल, हे एक गाव पूर्ण हिरवेगार दिसेल,असा विश्वास श्री.आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महाड नायब तहसिलदार श्री.कुडळ, उपसरपंच श्री.मस्के, महाड वनक्षेत्रपाल श्री.साहू, मंडळ अधिकारी श्री.पाटील, तलाठी श्री.तोडकरी व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
000