Home बातम्या ऐतिहासिक जालना जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्याकरीता गुन्हेगारी प्रवृत्तीला तात्काळ आळा घालावा – पालकमंत्री राजेश टोपे – महासंवाद

जालना जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्याकरीता गुन्हेगारी प्रवृत्तीला तात्काळ आळा घालावा – पालकमंत्री राजेश टोपे – महासंवाद

0
जालना जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्याकरीता गुन्हेगारी प्रवृत्तीला तात्काळ आळा घालावा – पालकमंत्री राजेश टोपे – महासंवाद

जालना दि. 13 (जिमाका) :- सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता पोलीसांनी  गुन्हेगारी प्रवृत्तींवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जिल्हयात अतिरिक्त पोलीस स्थानकांच्या संख्या वाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न केला  जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज व्यापारी महासंघाच्या आयोजित बैठकीत  ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास गोरंट‌्याल, जिल्हाधिकरी डॉ. विजय राठोड,  अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आदींसह व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी व  अन्य व्यापारी उपस्थित होते.

श्री. टोपे म्हणाले की, जालना शहर व जिल्हयात शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कडकपणे कारवाई करावी. विशेषत: औद‌्योगिक वसाहतीत अधिक लक्ष घालून उद‌्योजक, कामगार व नागरिकांना  कुठल्याही  प्रकाराचा त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. शहर व ग्रामीण भागात पोलीस स्थानकांची संख्या वाढविण्यासाठी यापूर्वीच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. राज्याचे गृहमंत्री, सचिव व पोलीस महासंचालक यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करुन जालना जिल्हयातील सुरक्षा विषयक बाबी व पोलीस स्थानकांची संख्या वाढ याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल.

बोगस प्रॉपर्टी कार्डधारकांविरोधात कडक कार्यवाईची  सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, बोगस प्राॅपर्टी कार्डधारक हा गंभीर विषय असून अशा कार्डधारकांविरोधात जिल्हा व पोलीस प्रशासनाने  तातडीने कारवाई करावी.  दबावतंत्राने अतिक्रमण करणाऱ्यांचीही अजिबात गय करु नये. कुठल्याही अवैध व्यवसायाला  थारा मिळता कामा नये. पोलीसांनी वेळीच  गुन्हेगारांना कायद‌्याचा बडगा दाखवून  गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालावा

अत्याधुनिक अशा सर्वसाधारण व ऑर्थोपेडीक शस्त्रक्रियागृहासह शव चिकित्सागृहाच्या नूतन इमारतीचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण

खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या शस्त्रक्रियागृहांच्या माध्यमातून आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने द्या – पालकमंत्री राजेश टोपे

जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त अशा सर्वसाधारण व ऑर्थोपेडीक शस्त्रक्रियागृहाबरोबरच उभारण्यात आलेल्या शवचिकित्सागृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर अत्याधुनिक व सर्व सुविधांनीयुक्त उभारण्यात आलेल्या शस्त्रक्रियागृहाचा उपयोग सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी करावा अशी सूचना पालकमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ‍. विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले वैद्यकीय अधिकारी डॉ प्रताप गायकवाड, डॉ. संजय जगताप, डॉ. नितीन पवार, डॉ. प्रवीण मरकडे, डॉ राजू जाधव, डॉ. अनिल पवार, डॉ. योगेश राठोड, डॉ. अभय गोंदीकर, डॉ. राहुल भालेराव, डॉ. नितीन शहा, डॉ. शेख आरीफ, डॉ. शेजुळे, डॉ. मूलगीर, डॉ. अर्पणा सोळुंके, डॉ. उमेश जाधव, डॉ. संतोष जायभाय आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य क्षेत्रात नवनवीत तंत्रज्ञान विकसित होत आहे.  या तंत्रज्ञानाचा वापर करुन आरोग्याच्या सेवा अधिक बळकट करण्यावर शासनामार्फत भर देण्यात येत आहे.  अत्याधुनिक अशा शस्त्रक्रियागृहांची उभारणी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात येणार असुन जालन्यापासून याचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या शस्त्रक्रियागृहामध्ये संसर्गबाधा होऊ नये याची परिपूर्ण काळजी घेत शस्त्रक्रियागृहाला स्टेनलेसस्टीलचे आवरण देण्यात आले असुन या ठिकाणी मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, ऑक्सिजन आदी सुविधांबरोबरच तीन प्रकारचे फिल्टरही बसविण्यात आले आहेत.  ऑर्थोपेडीक शस्त्रक्रियागृहात अत्याधुनिक सीयाम मशिन्स, फ्रॅक्चर टेबल आदी अत्याधुनिक अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने सर्वसामान्यांना या ठिकाणी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

शवचिकित्सागृहाचीही भव्य अशी इमारत उभारण्यात आली असुन या ठिकाणी दोन मोठे हॉल, बॉडीवॉश, व्हिसेरासाठी स्वतंत्र दालन, शवपेट्या ठेवण्यासाठी सुविधा यासह इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. शवचिकित्सेमध्ये तातडीने व्हिसेराचा अहवाल मिळण्याबरोबरच पोलीस यंत्रणेबरोबर समन्वय राहण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती करुन त्याची अंमलबजावणीही लवकरच करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह परिचारिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-