कोल्हापूर दि.26 (जिमाका):- पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश व मोडी पत्रांचे विविध प्रकार या ग्रंथांतून शाहू राजांचे समतेचे विचार लोकांपर्यंत पोहाेचतील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी व्यक्त केला.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमित्त येथील शाहू स्मारक येथे सांस्कृतिक कार्य विभाग, पुराभिलेख संचालनालय व कोल्हापूर पुरालेखागार कार्यालच्यावतीने आयोजित राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जीवनपटावर आधारित दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजिकुमार उगले, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व इंद्रजित सावंत यांच्यासह मान्यवर नागरीक व शाहूप्रेमी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात सांस्कृतिक कार्य विभाग, पुराभिलेख संचालनालय व कोल्हापूर पुरालेखगार कार्यालयाने पुस्तके प्रकाशित करुन शाहू राजांना अनोख्या पद्धतीने आजरांजली वाहिली आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जीवनपटावर आधारित दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनातून समतेचा विचार पोहाेचविण्यासाठी विभागाने केलेले काम कौतुकास्पद असून त्यांच्या या उपक्रमास मी शुभेच्छा देत आहे.
प्रारंभी पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजिकुमार उगले यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात राजर्षी शहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग-1, मोडी पत्रांचे विविध प्रकार आणि चित्रप्रदर्शनाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शहू छत्रपतींचे निवडक आदेश आणि मोडी पत्रांचे विविध प्रकार खंड 1 या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
000000