Home बातम्या ऐतिहासिक वास्तू संग्राहलयास भेट देणारी व्यक्ती सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल – पालकमंत्री सतेज पाटील – महासंवाद

वास्तू संग्राहलयास भेट देणारी व्यक्ती सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल – पालकमंत्री सतेज पाटील – महासंवाद

0
वास्तू संग्राहलयास भेट देणारी व्यक्ती सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल – पालकमंत्री सतेज पाटील – महासंवाद

कोल्हापूर दि.26 (जिमाका) :- लक्ष्मी विलास पॅलेस हे राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले वास्तू संग्रहालय आजपासून लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येत असून या संग्राहलयास भेट देणारी प्रत्येक व्यक्ती राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज व्यक्त केला.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमित्त येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे शाहू महजाराज यांच्या प्रतिमेस पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व इंद्रजित सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, शाहू महाराजांचा समतेचा विचार लोकांसमोर जावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. शाहू राजांचा समतेचा आणि सर्वधर्म समभाव हा विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी स्मृती शताब्दी वर्षात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे असून हे विचार भावी पिढीला प्रेरणा देणारे आहेत. वास्तू संग्रहालयाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे विचार, कार्य आणि इतिहास नव्या पिढीसमोर नक्कीच जाईल. या वास्तू संग्राहलयाच्या पुढच्या टप्प्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

शाहू राजांचे समाजाभिमुख काम प्रेरणा देणारे – ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ

राजर्षी शाहू महाराजांच्या 148 जयंती निमित्त शुभेच्छा देवून ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले. राजर्षी शाहू महाराज यांनी परिर्वतन व समतेसाठी केलेले काम हिमालयासारखे आहे. सामान्यांच्या हितासाठी स्वत:चा खजिना रिकामा करणाऱ्या राजाने समतेचा कामाचा पाया रचला. गोरगरीब, सामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक व प्रेरणादायी असून त्यांनी घेतलेल्या समाजाभिमुख निर्णयाचा वसा पुढे नेण्याचे काम राज्य शासनमार्फत होत आहे.

लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या पुढच्या टप्प्याच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांनी यावेळी केली.

तदनंतर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व मान्यवरांनी वास्तू संग्राहलयाची पाहणी केली
000000