मुंबई, दि. 22 : ‘मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या विविध श्रेणीतील चित्रपटांचे निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ज्ञ आदींचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आज 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट ‘सुमी’ ने पटकावला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून ख्यातनाम गायक राहूल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
‘गोष्ट एका पैठणीची’ (सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट), ‘फनरल'(सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट), ‘जून, गोदाकाठ, अवांछित’ (तीनही विशेष उल्लेखनीय चित्रपट) पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमांवर आधारित ‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि त्यातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल अजय देवगण यांचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या अनिश गोसावी, आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.
000