मुंबई, दि. ३ : राज्य शासनाच्या सेवेत ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी, सेवायोजन कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या नियुक्त्या मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवानिवृत्त झालेल्या श्रीमती प्रेमिला जेसिंग कुंढडिया आणि जावेद अब्दुल वहिद खान यांना त्यामुळे सेवानिवृत्ती विषयक सर्व लाभ मिळणार आहेत.
प्रकाशने शाखेतील लिपिक श्रीमती प्रेमिला जेसिंग कुंढडिया या ३० एप्रिल २०१६ रोजी शासन सेवेतून निवृत्त झाल्या. तसेच लिपिक-टंकलेखक जावेद अब्दुल वाहीद खान हे ३० जानेवारी २०२० रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर दोघांनाही फक्त भविष्यनिर्वाह निधी, रजा रोखीकरणाचे पैसे मिळाले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनविषयक लाभ मिळणे बाकी होते. सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यासन -३४ ने विशेष प्रयत्न केल्यामुळे त्यास आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली.सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
0000