चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती व त्याचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुण पिढीला माहित व्हावा. देशभक्तीची भावना जनमानसात कायमस्वरूपी तेवत राहावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या सुचनेनुसार 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके उपस्थित होत्या.
‘हर घर झेंडा’ अभियानासाठी जिल्ह्यात जवळपास साडेचार लक्ष झेंड्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने व स्वखर्चाने आपापल्या घरावर झेंडे लावणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत घरावरील झेंडा दिवसरात्र फडकविता येणार आहे. इतर ठिकाणी मात्र ध्वज संहितेचे पालन करून झेंडा फडकवायचा आहे. जिल्हा प्रशासनाने विविध सामाजिक संघटना, उद्योजक यांना झेंड्यासाठी प्रायोजकत्व घेण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच विविध उपक्रम राबविण्याठी सर्व यंत्रणांना देखील निर्देश दिले आहेत.
सदर झेंडे ग्रामपंचायत, नगर पालिका, नगर पंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय तसेच तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बचत गट, स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना उपलब्ध होईल. जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी 75 फूट उंचीचा ध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वराज महोत्सवाचे सुद्धा आयोजन करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. या अंतर्गत 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत होईल. तसेच स्वराज महोत्सवांतर्गत हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण, तिरंगा बलून हवेत सोडणे, विशेष ग्रामसभांचे आयोजन, ग्राम, तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रभातफेरी, ऐतिहासिक वारसा संवर्धन, चित्रांचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत गट मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धन, शेतकरी मार्गदर्शन आदी उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली.
नागरिकांनी बुस्टर डोज घेण्याचे आवाहन : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्यावतीने 15 जुलै ते 30 सप्टेंबर या 75 दिवसांत ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत मोफत बुस्टर डोज देण्यात येणार आहे.जिल्ह्यात बुस्टर डोजकरीता 11 लक्ष 92 हजार पात्र लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत 1 लक्ष 9 हजार 383 नागरिकांनी बुस्टर डोज घेतला आहे. दुसरा डोज घेऊन सहा महिने किंवा 26 आठवडे झाले असल्यास नागरिकांनी बुस्टर डोज घ्यावा.भविष्यात कोविडच्या दूरगामी परिणामांपासून सुरक्षित राहायचे असेल तर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
०००
‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीद्वारे जनजागृती
Ø विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, नागरिकांचा सहभाग
चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या अभियानात सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन, जि.प. शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.5 ऑगस्ट) चंद्रपूर शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथून आमदार किशोर जोरगवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक समशेर सुभेदार, पोलिस निरीक्षक श्री. मुळे आदी उपस्थित होते. सदर रॅली जिल्हा क्रीडा संकूल येथून मित्रनगर, केवलराम चौक, सेंट मायकल स्कूल, जटपूरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक, परत जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, जिल्हाधिकारी निवासस्थान या मार्गाने गेल्यानंतर जिल्हा क्रीडा संकूल येथे समारोप करण्यात आला.
सायकल रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सायकल क्लब, विविध क्रीडा मंडळे, अधिकारी व कर्मचारी, क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते. या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथील कर्मचारी व इतर खेळाडूंनी सहकार्य केले.
०००