Home बातम्या ऐतिहासिक सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला

0
सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला

मुंबई दि. 14: मध्यमवर्गीयांमध्ये देखील शेअर बाजाराच्या माध्यमातून गुंतवणुकीची आवड निर्माण करणाऱ्या, शेअर बाजाराचे गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

शेअर बाजार हा केवळ मोजक्या श्रीमंत लोकांसाठी नसून  सर्वसामान्यांनादेखील शेअर बाजारात नियोजनबद्ध गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे झुनझुनवाला यांनी दाखवून दिलं. स्वतः त्यांनी सुद्धा अतिशय कमी पैशाची गुंतवणूक करून आपली या क्षेत्रातली सुरुवात केली होती, आणि गुंतवणुकीचा अभ्यास करून एक उंची गाठली.

शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे केवळ सट्टा बाजारातली गुंतवणूक नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या गुंतवणुकीचे मोठे योगदान असते. त्यादृष्टीने झुनझुनवाला यांनी मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना दिशा दाखविली. राकेश झुनझुनवालांनी सुचवलेल्या शेअर्सकडे आणि त्यांच्या सल्ल्याकडे सर्वसामान्य गुंतवणूकदार लक्ष ठेवून असायचे. विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी त्यांनी  अकासा एअर ही विमान सेवाही सुरु केली होती. त्यांच्या निधनाने निश्चितपणे गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.