सातारा दि. 15 : सातारा शहर पोलीस स्टेशन अंकित सदर बझार पोलीस स्टेशनच्या नुतन इमारतीचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, यशराज देसाई यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई म्हणाले, पोलीसांना आधुनिक सुविधा देण्यावर शासनाचा भर राहिला आहे. गृह राज्यमंत्री असताना पोलीसांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पोलीस स्टेशनच्या वाहनांचाही समावेश आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला वाहने आहेत. पोलीस अधीक्षक श्री. बंसल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात चांगले काम सुरु आहे. यापुढेही अशा प्रकारे काम करीत रहा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पोलीस चौकी उभारण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींचाही श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
रानभाज्या डोंगरी भागात तसेच बांधावर नैसर्गिंक रित्या उगवतात. ह्या भाज्या आरोग्यासाठी गुणकारक आहेत याचे महत्व शहरी भागातील नागरिकांना पटवून सांगा, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कृषी विभागाच्यावतीने हॉटेल लेक व्ह्यू, सातारा याठिकाणी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, यशराज देसाई यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, शहरी भागातील नागरिकांना नैसर्गिकरित्या उगाविलेल्या रानभाज्यांचे महत्व समजावे तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्दशाने प्रत्येक वर्षी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांच्या हिताला शासनाने प्राधान्य दिल असून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे सांगून रानभाजी महोत्सवाला शुभेच्छाही दिल्या.