लातूर,दि.20 (जिमाका) :- उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर, लातूर येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट दिली. नावीन्यपूर्ण उमंग सेंटर उभं केल्याद्दल कौतुक करून हे सेंटर जास्तीत जास्त प्रभावीपणे चालविण्यासाठी व दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करावेत, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.
उमंग सेंटर हे देशातील अतिशय चांगले तसेच राज्याला दिशा देणारे सेंटर आहे. या सेंटरमध्ये चालविण्यात येणाऱ्या दिव्यांग मुलांसाठी न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट, अर्ली इंटर्वेशन, ऑक्युपेसनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियर थेरपी, सायकॉलॉजिकल थेरेपी, फिजियोथेरेपी, स्पेशल एज्युकेशन व विशेष सेन्सरी पार्क या सर्व ट्रीटमेंट व थेरपीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेचे व उमंग सेंटर मधील थेरपिस्ट तसेच कर्मचाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. त्यांच्या बरोबर फोटो काढून घेतले. उपचार सुरु असलेल्या तिथल्या बालकांना उचलून घेऊन कौतुकही केले.
या भेटीच्या वेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, सचिव सिध्दिविनायक प्रतिष्ठान लातूरचे डॉ.किरण उटगे यांच्यासह विविध विभागाच्या विभाग प्रामुखांची उपस्थिती होती.
****