Home ताज्या बातम्या राजभवनाचा इतिहास पुढे आणण्यासाठी प्रयत्न व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राजभवनाचा इतिहास पुढे आणण्यासाठी प्रयत्न व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
राजभवनाचा इतिहास पुढे आणण्यासाठी प्रयत्न व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 26 : राजभवन म्हटले की सहसा राजकारणासंबंधी विषयांची चर्चा होते. अधूनमधून राजभवनातील राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची छवी वर्तमानपत्रात छापून येते व राजभवनाच्या सौंदर्याची चर्चा होते. परंतु, महाराष्ट्र राजभवन हे देशातील सर्वाधिक जुने राजभवन आहे. पूर्वाश्रमीचे ‘गव्हर्मेंट हाऊस’ असलेल्या राजभवनाला मोठा इतिहास लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा इतिहास माहितीपट- चित्रपट रूपाने लोकांसमोर येणे गरजेचे आहे. या दृष्टीने जॅकी श्रॉफ यांच्या सारख्या चित्रपट सृष्टीतील अनुभवी व प्रसिद्ध लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

राजभवनाच्या जनसंपर्क शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘राजभवनचा समुद्र किनारा’ या माहितीपटाचे प्रदर्शन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 26) राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी पूर्वीचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी राजभवनातील भूमिगत बंकर प्रकाशात आणले. आज त्या ठिकाणी क्रांतिकारकांचे दालन उभारण्यात आले असून पंतप्रधानांनी देखील त्याला भेट देऊन त्याचे कौतुक केले. या परिसराचा विस्तृत इतिहास समाजापुढे आणल्यास राजभवन हे प्रेरणा केंद्र होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

लहानपणी राजभवनला भीत भीत यायचो; आज सन्मानाने बोलावले याचा आनंद – जॅकी श्रॉफ

आपण राजभवनाजवळील तीन बत्ती येथे एका लहान चाळीत लहानाचे मोठे झालो. राजभवन येथे लहानपणी क्रिकेट खेळायला तसेच येथील समुद्र किनाऱ्यावर लपून तर कधी मित्रांच्या मदतीने भीत-भीत यायचो. आज त्याच राजभवनावर राज्यपालांनी सन्मानाने बोलावले, याचा वेगळा आनंद वाटतो, असे जॅकी श्रॉफ यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू

यावेळी उपस्थितांना जॅकी श्रॉफ यांनी आपल्या खास शैलीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे व जगवली पाहिजे. ‘पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू’ असे उपस्थित लहान मुलांना सांगितले.

‘राजभवनातील समुद्र किनारा’ या 15 मिनिटांच्या माहितीपटातून राजभवनाचा तसेच येथील समुद्र किनाऱ्याचा इतिहास सांगण्यात आला असून जॅकी श्रॉफ, जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ व अभिनेते भरत दाभोळकर तसेच राजभवनातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी यांनी त्यात आपल्या आठवणी सांगितल्या आहेत.

००००